नागपूर :- अर्धशतकाहून अधिक काळ अमेरिकेत असूनही मराठीत लेखन करणारे कर्नल डॉ. नारायण जयरामराव देशमुख (मूळ राजुरा निवासी) यांनी आपले लेखन जारी ठेवावे, अशी अपेक्षा मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी व्यक्त केली आहे.
कर्नल डॉ. देशमुख यांची 3 मराठी पुस्तके प्रकाशित झाली आहेत. अमेरिकेतील मराठी कर्नल, देशाटनाची शतपावली आणि दलाई लामांवरील “शांतिदूताचा दर्शनयोग” ही तीनही पुस्तके नागपूरच्या लाखे प्रकाशनाने प्रकाशित केली आहेत. यातील देशाटनाच्या पुस्तकाला डॉ. जोशी यांनी दीर्घ प्रस्तावना लिहून दिल्याबद्दल देशमुखांनी परवा त्यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले.
देशाटनाचे शतक आपण ओलांडले (102 देश) आणि आज 88 व्या वर्षी सुद्धा आपण ठणठणीत आहात. या प्रवासाच्या माहितीसह वैद्यकीय व्यवसाय, अमेरिकेतील जनजीवन आदी विषयांवरही आपण मराठीत लिहीत राहावे. त्यांचे संकलन वाचनीय ठरेल, असे डॉ. जोशी यांनी सुचवले.
यावेळी झालेल्या चर्चेत ज्येष्ठ पत्रकार विनोद देशमुख, कवयित्री मेघना वाहोकर, डॉ. विलास देशपांडे, खामगावचे पत्रकार डॉ. राजेश राजोरे आदी सहभागी झाले होते.








