spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

स्वातंत्र्यदिनाच्या पर्वावर कढोली ग्रामपंचायतीचा कौतुकास्पद निर्णय

– जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांना घरपट्टी-पाणीपट्टीत सवलत; सरपंच लक्ष्मण करारे यांच्या पुढाकाराचे सर्वत्र कौतुक

कामठी :- गावातील जिल्हा परिषद शाळेची घटती विद्यार्थीसंख्या लक्षात घेऊन कढोली ग्रामपंचायतीने शाळा वाचविण्यासाठी अभिनव आणि दूरदृष्टीपूर्ण निर्णय घेतला आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त कढोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित कार्यक्रमात गावचे प्रथम नागरिक तथा सरपंच लक्ष्मण करारे यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला.

कढोली ग्रामपंचायत हद्दीतील ज्या पालकांची मुले कढोली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेत आहेत, अशा कुटुंबांना घरपट्टी व पाणीपट्टीमध्ये सवलत देण्यात येणार आहे. सरकारी शाळांमधील घटती विद्यार्थीसंख्या आणि खासगी शाळांकडे वाढणारा पालकांचा कल याच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीचा हा निर्णय विशेष महत्त्वाचा मानला जात आहे.

‘गावातील मुले गावातीलच शाळेत शिकली पाहिजेत, जिल्हा परिषद शाळा टिकली पाहिजे आणि तिची विद्यार्थीसंख्या वाढली पाहिजे’ या सकारात्मक भूमिकेतून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे हा केवळ करसवलतीचा निर्णय नसून गावातील शैक्षणिक व्यवस्था बळकट करण्यासाठी उचललेले पाऊल असल्याची भावना व्यक्त होत आहे.

सरकारी शाळा वाचविण्याची चर्चा अनेक स्तरांवर होत असताना कढोली ग्रामपंचायतीने त्यासाठी प्रत्यक्ष कृतीची दिशा दाखविली आहे. पालकांना प्रोत्साहन देतानाच गावातील शाळेची विद्यार्थीसंख्या वाढविण्याचा हा प्रयत्न इतर ग्रामपंचायतींसाठीही आदर्श ठरू शकतो.

‘गावची शाळा वाचली, तर गावचे भविष्य घडेल; विद्यार्थी वाढले तर कडोलीची प्रगती निश्चितच वाढेल,’ या विचारातून घेण्यात आलेल्या निर्णयाचे पालक, ग्रामस्थ आणि शैक्षणिक क्षेत्रातून स्वागत होत आहे. शाळेच्या भवितव्यासाठी पुढाकार घेणारे सरपंच लक्ष्मण करारे आणि कढोली ग्रामपंचायतीचे या उपक्रमाबद्दल अभिनंदन होत आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.