spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

ऑरेंज स्ट्रीटवरील वाहन पार्किंग स्थळाची आयुक्तांनी केली पाहणी

– वाहतूक कोंडी संदर्भात एनडीएस पथक व वाहतूक पोलीसांना दिले निर्देश

नागपूर :- जयप्रकाशनगर मेट्रो स्टेशनपासून ऑरेंज स्ट्रीटकडे जाणाऱ्या मार्गावरील पार्किंग स्थळाची आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी मंगळवारी(ता.१७) पाहणी केली. पाहणीदरम्यान मार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात आयुक्तांनी चर्चा केली. याठिकाणी वाहने रस्त्यावर उभी राहणार नाही, याची दक्षता घेण्यासाठी एनडीएसचे पथक व वाहतूक विभागाचे पोलीस तैनात करण्यासह दिशादर्शक फलक लावण्याचे निर्देश दिले.

यावेळी मुख्य अभियंता  मनोज तालेवार, अधीक्षक अभियंता लिना उपाध्ये, नगररचना विभागाचे उपसंचालक गिरीश गोडबोले, कार्यकारी अभियंता रविंद्र बुंधाडे, कार्यकारी अभियंता अनिल गेडाम, नगररचना विभागाचे सहायक संचालक ऋतुराज जाधव, झोनचे सहायक आयुक्त धनंजय जाधव, प्रकल्प अभियंता राजीव गौतम उपस्थित होते.

वर्धा मार्गावरील जयप्रकाशनगर मेट्रो स्टेशन चौकातून ऑरेंज स्ट्रीटवर वर्दळीच्या काळात रस्त्यावर वाहने उभी राहत असल्याने वाहतूक कोंडी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या मार्गावर असलेल्या व्यावसायिक आस्थापनांनी ग्राहकांसाठी केलेल्या पार्किंग स्थळाची पाहणी देखील आयुक्तांनी यावेळी केली. चारचाकी व दुचाकी वाहनांसाठी पुरेशी पार्किंगची व्यवस्था येत्या १५ दिवसात करण्याचे निर्देश आयुक्तांनी व्यावसायिक आस्थापनांच्या संचालकांना दिले.

त्याचप्रमाणे ऑरेंज स्ट्रीटवर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथक (एनडीएस) तसेच वाहतूक पोलीस विभागाशी समन्वय साधून वाहतूक पोलीस तैनात करण्याचे निर्देश ही त्यांनी दिले. त्याचप्रमाणे दुकानांमध्ये येणाऱ्या ग्राहकांना पार्किंगची व्यवस्था असल्याचे दिशादर्शक फलक या जागेवर ठळकपणे दिसतील अशा ठिकाणी आस्थापनांच्या मालकांनी लावावे. जेणेकरून ग्राहकांना पार्किंगची व्यवस्था असल्याची ठळक माहिती तात्काळ मिळेल. तसेच आस्थापनांचे कर्मचारी देखील तैनात करून रस्त्यावर कोणतेही वाहन उभे राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. असेही आयुक्तांनी यावेळी सुचविले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.