कामठी :- मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेदरम्यान बूथ लेव्हल अधिकारी (BLO) यांनी मतदारांच्या घरोघरी जाऊन प्रत्यक्ष पडताळणी करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी, कामठी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शासनाच्या नियमानुसार BLO यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन सत्यापन करणे अपेक्षित आहे. मात्र कामठी शहरातील काही ठिकाणी BLO एकाच ठिकाणी बसून पडताळणी प्रक्रिया राबवत असल्याचे निदर्शनास आले आहे.
यामुळे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, आजारी तसेच नोकरी-व्यवसायामुळे दिवसभर बाहेर असलेल्या मतदारांना सत्यापनासाठी उपस्थित राहणे कठीण जात असून, अनेक पात्र मतदार पडताळणीपासून वंचित राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. परिणामी SIR प्रक्रिया शंभर टक्के प्रभावीपणे पूर्ण होणार नसल्याची चिंता निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.
त्यामुळे कामठी तालुका व शहरातील सर्व BLO यांना घरोघरी जाऊन प्रत्यक्ष सत्यापन करण्याचे स्पष्ट आदेश द्यावेत, जेणेकरून प्रत्येक पात्र मतदाराचा सहभाग सुनिश्चित होईल, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.




