spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

संविधान चौकाचे विस्तारीकरण करून ‘राष्ट्रीय संविधान प्रेरणास्थळ’ घोषित करण्याची मागणी

– मुख्यमंत्र्यांना निवेदन; पत्रकार परिषदेत आंदोलनाची भूमिका स्पष्ट

नागपूर :- संविधान चौक डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर विस्तारीकरण समिती च्यावतीने पत्रपरिषदेत संविधान चौकाचे तातडीने विस्तारीकरण करून संविधान चौक ते झिरो माईल परिसराचा सर्वांगीण विकास करावा, तसेच या परिसराला “राष्ट्रीय संविधान प्रेरणास्थळ” म्हणून घोषित करावे, अशी ठाम मागणी करण्यात आली. समितीने सांगितले की, नागपूर येथील संविधान चौक हा देशातील पहिला संविधान चौक असून भारतीय राज्यघटनेतील स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांचे प्रतीक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी नागपूरचे ऐतिहासिक नाते असल्याने या चौकाला राष्ट्रीय स्तरावर विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. गेल्या काही वर्षांत संविधान चौक हा विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि लोकशाही आंदोलनांचे प्रमुख केंद्र बनला आहे. मात्र वाढत्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी, नागरिकांची गैरसोय तसेच आपत्कालीन सेवांनाही अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे या परिसराचे नियोजनबद्ध विस्तारीकरण आणि सुशोभीकरण करणे अत्यंत आवश्यक असल्याचे समितीने नमूद केले.

समितीच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत :

– संविधान चौक ते झिरो माईल चौकादरम्यान आवश्यक जागा संपादित करून संविधान चौकाचे तातडीने विस्तारीकरण करण्यात यावे.

– संविधान चौक ते झिरो माईल परिसराचा एकात्मिक विकास आराखडा तयार करून जागतिक दर्जाचे सुशोभीकरण करण्यात यावे.

– नागरिकांसाठी प्रशस्त पदपथ, स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची सुविधा, दिव्यांगांसाठी सुलभ सुविधा आणि पुरेशी वाहनतळ व्यवस्था उभारण्यात यावी.

– लोकशाही मार्गाने आंदोलने, धरणे, मोर्चे आणि सार्वजनिक कार्यक्रमांसाठी स्वतंत्र नियोजित जागा विकसित करण्यात यावी.

– संविधान चौकाला “राष्ट्रीय संविधान प्रेरणास्थळ” घोषित करून विशेष विकास आराखडा मंजूर करावा आणि आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा.

याबाबतचे सविस्तर निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सादर करण्यात आले असल्याची माहिती समितीने दिली.या उपक्रमाचे मुख्य संयोजक संतोष तायडे असून, संयोजक म्हणून ॲड. देवेंद्र यादव, प्रकाश कुंभे, सुरेश मून, सुरेंद्रपाल सिंग, दिनेश शर्मा, जनार्दन मून, क्षितिज गायकवाड, संजय सहारे, रजत महेशगवळी, वृषभ राऊत, सोनू मंडपे आणि इतर पदाधिकारी सहभागी आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.