spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

१५ दिवसांत संत्रा फळपीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा !

– रुपेश वाळके यांनी दिला कृषी विभागाला आंदोलनाचा इशारा ! 

– शासनाने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नये ! 

मोर्शी, तालुका प्रतिनिधी :-  “आंबिया बहार २०२५-२६ च्या हवामानावर आधारित संत्रा फळपीक विम्याची नुकसानभरपाई १५ दिवसांत अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी. शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या पैशासाठी वारंवार कार्यालयांच्या फेऱ्या मारण्याची वेळ येता कामा नये. १५ दिवसांत सकारात्मक निर्णय न झाल्यास संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष रुपेश वाळके यांनी विभागीय कृषी सहसंचालक, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, व विमा कंपनीला निवेदन सादर करून दिला आहे.

विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेल्या आंबिया बहार २०२५-२६ हवामानावर आधारित संत्रा फळपीक विम्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. बदलत्या हवामानामुळे संत्रा पिकाला मोठा फटका बसला असून, पीकविमा योजनेअंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची नुकसानभरपाई अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या संत्रा उत्पादकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

संत्रा उत्पादन हे पूर्णपणे हवामानावर अवलंबून असलेले पीक आहे. मागील हंगामात तापमानातील मोठी वाढ, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, गारपीट तसेच इतर प्रतिकूल हवामानामुळे संत्रा बागांवर मोठा परिणाम झाला. फळगळ, फळांचा दर्जा खालावणे, फळांची अपेक्षित वाढ न होणे आणि उत्पादनात घट अशा अनेक समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले. त्यातच खतांचे वाढलेले दर, कीटकनाशके व बुरशीनाशकांचा खर्च, मजुरी, सिंचनाचा खर्च आणि बाग व्यवस्थापनासाठी होणारा मोठा आर्थिक खर्च यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडले आहे.

अशा परिस्थितीत संत्रा फळ पीकविमा नुकसानभरपाई ही शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक आधार ठरू शकते. मात्र विम्याची रक्कम मिळण्यासाठी होत असलेली प्रतीक्षा शेतकऱ्यांच्या अडचणी आणखी वाढवत आहे.

शेतकऱ्यांनी शासनाच्या नियमानुसार पीकविम्याचा हप्ता भरून आपल्या संत्रा पिकाला विमा संरक्षण दिले आहे. त्यामुळे प्रतिकूल हवामानामुळे विमा योजनेच्या निकषानुसार नुकसान झाले असल्यास पात्र शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांकडून विमा हप्ता घेताना प्रक्रिया तत्परतेने केली जाते; मग नुकसानभरपाई देण्याच्या वेळी शेतकऱ्यांना प्रतीक्षा का करावी लागते? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रुपेश वाळके यांनी उपस्थित केला आहे.

शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नका !

संत्रा उत्पादक शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून हवामानातील बदल, नैसर्गिक आपत्ती, उत्पादन खर्चातील वाढ आणि बाजारभावातील अनिश्चिततेशी संघर्ष करीत आहेत. त्यामुळे शासनाने या प्रश्नाकडे केवळ प्रशासकीय विषय म्हणून न पाहता शेतकऱ्यांच्या उपजीविकेशी जोडलेला गंभीर प्रश्न म्हणून पाहावे, शासनाने व विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नये.

“संत्रा उत्पादकांच्या हक्काचा पैसा रोखून ठेवू नका!”

“संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या विश्वासाने कर्जबाजारी होऊन पीकविमा भरला आहे. नैसर्गिक संकटात त्यांना विम्याच्या आधाराची गरज आहे. त्यामुळे विम्याची रक्कम देण्यासाठी आता आणखी विलंब सहन केला जाणार नाही. शासनाने व विमा कंपनीने १५ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करावेत; अन्यथा शेतकरी हितासाठी आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल.”

— रुपेश वाळके अध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस,मोर्शी तालुका


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.