spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

गडचिरोलीतील आश्रमशाळा दुर्घटनेप्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची धर्मपाल मेश्राम यांची मागणी

नागपूर :- गडचिरोली येथील आदिवासी आश्रमशाळेत तीन मुलींचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अत्यंत गंभीर आणि संतापजनक आहे. या घटनेला संबंधित संस्था चालकांचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे माजी उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी केला आहे. दोषी संस्था चालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

या घटनेची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्याचे निर्देश दिले असून, संबंधित आदिवासी आश्रमशाळेची मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्याचे आदेश दिल्याबद्दल धर्मपाल मेश्राम यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे अभिनंदन केले आहे.

मुख्यमंत्र्यांची ही तत्परता आणि संवेदनशीलता कौतुकास्पद असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत सरकारची शून्य-सहिष्णुतेची भूमिका यातून स्पष्ट होते, असे मेश्राम यांनी म्हटले आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील सर्व आदिवासी आश्रमशाळा तसेच मुली व मुलांच्या वसतिगृहांचे तातडीने सर्वंकष सुरक्षा ऑडिट व तपासणी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. अनेक वर्षांपासून एखाद्या संस्थेत सुरक्षा, स्वच्छता, आरोग्य किंवा विद्यार्थ्यांच्या संरक्षणासंदर्भात त्रुटी असतील, तर त्याची जबाबदारी निश्चित करण्यात यावी.

विशेषतः संबंधित जिल्ह्यातील सामाजिक न्याय विभागाच्या सहाय्यक आयुक्तांसह जबाबदार प्रशासकीय अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून, हलगर्जीपणा आढळल्यास त्यांच्यावरही प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशी मागणी धर्मपाल मेश्राम यांनी केली आहे.

आदिवासी आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीविताची आणि सुरक्षेची कोणतीही तडजोड सहन केली जाऊ नये. भविष्यात अशा दुर्दैवी घटना घडू नयेत यासाठी राज्यातील सर्व आश्रमशाळांची नियमित तपासणी आणि सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्याची गरज असल्याचेही मेश्राम यांनी स्पष्ट केले.

Popular Articles