◼️रासायनिक खतांच्या खर्चात मोठी बचत
सचिन चौरसिया, रामटेक :- सध्याच्या काळात रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे शेतजमिनीचा पोत खालावत चालला आहे. यावर उत्तम पर्याय म्हणून धेंचा या हिरवळीच्या खताची लागवड करणे फायदेशीर ठरत आहे. तालुक्यातील काचुरवाही येथे कृषी विभागातील अधिका-यांनी क्षेत्रीय भेट दिली. यावेळी जिल्हा खनिजकर्म प्रतिष्ठान व कृषी विभाग यांचे संयुक्त विद्यमाने बियाणे वाटप केलेल्या धेंचा लागवडीची पाहणी केली. ‘धेंचा’ शेतजमीन सुपीकतेसाठी वरदान ठरत आहे. शिवाय त्याच्या वापराने रासायनिक खत खर्च्यात मोठी बचत होते. ही माहिती कृषी विभागातर्फे देण्यात आली. क्षेत्रीय भेटीत उपविभागीय कृषी अधिकारी ग्रीष्मा डेहणे, उप कृषी अधिकारी पी. एम. मेश्राम, सहाय्यक कृषी अधिकारी अखिलेश माहोरे, बाळकृष्ण सोमनाथे व शेतकरी उपस्थित होते.
धैंचा पिकाचे मुख्य फायदे
◼️नायट्रोजन ची निर्मिती : धेंचा पिक ४० ते ५० दिवसाचे पिक असून जमिनीत गाडल्यास नायट्रोजन ची निर्मिती होऊन पिकास हेक्टरी ६० ते ७० किलो नत्र मिळते. यामुळे रासायनिक खताच्या खर्चा मध्ये (विशेषता युरिया खत) ४० टक्यापर्यंत बचत होते.
◼️सेंद्रिय कर्ब वाढतो: धैंचा कुजल्यामुळे जमिनीत सेंद्रिय पदार्थांची भर पडते, ज्यामुळे मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
◼️नैसर्गिक नत्र पुरवठा: या द्विदल पिकाच्या मुळांवरील गाठी रायझोबियम जिवाणूंद्वारे हवेतील नायट्रोजन शोषून मातीत सोडतात.
◼️जमीन भुसभुशीत होते: धैंचाची मुळे जमिनीत खोलवर जातात, ज्यामुळे कडक व भुईसपाट झालेली जमीन भुसभुशीत आणि सुपीक होते.
◼️उत्पन्नात वाढ: अशा सुपीक जमिनीत पुढील मुख्य पिकांची वाढ उत्तम होऊन उत्पादनात मोठी वाढ होते.





