spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

रुग्ण सुरक्षेसाठी आयएमए भंडारा आक्रमक; सीसीएमपी नोंदणी निर्णयाचा कडाडून विरोध

प्रतिनिधि,भंडारा :- महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये (MMC) सीसीएमपी (CCMP) धारकांची नोंदणी करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) भंडारा शाखेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. आयएमए महाराष्ट्राच्या आवाहनानुसार, गुरुवारी भंडारा येथे राज्यव्यापी आंदोलनांतर्गत निषेध सभा घेण्यात आली. यावेळी रुग्णांच्या आरोग्याशी खेळू नका, अशा भावना डॉक्टरांनी व्यक्त केल्या.

स्थानिक आयएमए हॉल येथे पार पडलेल्या या बैठकीत सर्व डॉक्टरांनी एकमताने आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. बीएचएमएस (BHMS) पदवीधारक डॉक्टरांनी सहा महिन्यांचा ‘सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकोलॉजी’ (CCMP) पूर्ण केल्यानंतर त्यांची नोंदणी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये करण्याच्या निर्णयाला आयएमएने विरोध दर्शविला आहे. एमएमसी ही केवळ आधुनिक वैद्यकशास्त्र (Modern Medicine) क्षेत्रातील डॉक्टरांची नियामक संस्था असताना, अशा प्रकारे अन्य शाखेतील डॉक्टरांचा समावेश करणे तांत्रिकदृष्ट्या चुकीचे असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

रुग्णांच्या जीविताचा प्रश्न यावेळी बोलताना आयएमएच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, आधुनिक वैद्यकीय उपचारांसाठी सखोल शिक्षण, दीर्घकालीन क्लिनिकल प्रशिक्षण आणि कौशल्याची आवश्यकता असते. केवळ सहा महिन्यांच्या अल्पवधीच्या अभ्यासक्रमाच्या आधारे आधुनिक वैद्यकाची परवानगी दिल्यास रुग्णांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतात. वैज्ञानिक वैद्यकाचे संरक्षण आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा कायम राखणे ही काळाची गरज आहे.

कोणत्याही पॅथीला विरोध नाही आयएमए भंडाराने यावेळी स्पष्ट केले की, आमचा विरोध कोणत्याही विशिष्ट वैद्यकीय शाखेला किंवा डॉक्टरांना नसून, केवळ रुग्णहित आणि उपचारांच्या गुणवत्तेशी तडजोड होऊ नये यासाठी हा लढा आहे. चुकीच्या पद्धतीने होणाऱ्या या बदलामुळे भविष्यात आरोग्य व्यवस्थेवर विपरीत परिणाम होऊ शकतात.

शासनाने या निर्णयाचा गांभीर्याने फेरविचार करावा आणि सर्व संबंधित घटकांशी चर्चा करूनच पुढील पाऊल उचलावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनामुळे रुग्णांना झालेल्या गैरसोयीबद्दल आयएमएने दिलगिरी व्यक्त केली आहे. या बैठकीला भंडारा जिल्ह्यातील नामांकित डॉक्टर्स आणि आयएमएचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular Articles