भंडारा सिहोरा :- मानव आणि वन्यजीव संघर्षाची एक अत्यंत हृदयविदारक घटना आज ६ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास सिहोरा परिसरातील चुलरडोह व आगरीच्या जंगलात घडली. आपल्या पत्नीसह गुरे चारण्यासाठी गेलेल्या बन्सीलाल मेश्राम (५५) या गुराख्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला केला आणि त्यांना जबड्यात पकडून थेट डोंगराच्या दिशेने खेचून नेले. ही भीषण घटना मेश्राम यांच्या पत्नीच्या डोळ्यादेखत घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दावेझरी येथील रहिवासी बन्सीलाल मेश्राम हे दररोजप्रमाणे आपल्या पत्नीसह गाई-म्हशी चारण्यासाठी जंगलात गेले होते. दुपारी २ च्या सुमारास झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने बन्सीलाल यांच्यावर झडप घातली. काही कळायच्या आतच वाघाने त्यांना पकडून लगतच्या पहाडावर ओढत नेले. आपल्या पतीला डोळ्यासमोर वाघ घेऊन जात असल्याचे पाहून पत्नीने मोठा टाहो फोडला. घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी गावाकडे धाव घेत ग्रामस्थांना घडलेला प्रकार सांगितला.
गावात शोककळा आणि संताप
या घटनेची माहिती मिळताच दावेझरी आणि आसपासच्या गावातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. आपल्या कुटुंबाचा आधार असलेल्या एका गरीब गुराख्याचा असा बळी गेल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, वन्यजीवांच्या वाढत्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. मोठी शोधमोहीम सुरू घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थ आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडून जंगल परिसर आणि पहाडीवर बन्सीलाल मेश्राम यांची व्यापक शोधमोहीम राबवण्यात आली होती . बराच वेळ शोध घेतल्यावर अखेर डोंगराच्या एका भागात बन्सीलाल यांचा मृतदेह आढळून आला. वाघाने केलेल्या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता
पाच गावांमध्ये वाघाची धडकी
या घटनेमुळे हरदोली, धनेगाव, आगरी, दावेझरी आणि चुलरडोह या गावांमधील नागरिकांमध्ये वाघाची मोठी धडकी भरली आहे. जंगलालगत शेती असलेल्या शेतकऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने तात्काळ वाघाचा बंदोबस्त करावा आणि मेश्राम यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.





