spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

“भंडारा हादरले! साडेतीन वर्षांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न; शहरात तणाव, पोलीस बंदोबस्त तैनात”

भंडारा :- भंडारा शहरातील आंबेडकर वॉर्ड परिसरात गुरुवारी दुपारी एका साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर ३० वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचे वृत्त शहरात पसरताच नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली. पोलिसांनी आरोपीला तातडीने ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. दरम्यान, संतप्त नागरिकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाबाहेर (सिव्हिल हॉस्पिटल) मोठी गर्दी करत आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली.

दुपारी घडली घटना; आरोपीने स्वतःला करून घेतली दुखापत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गुरुवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास ही संतापजनक घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून आरोपीला बेड्या ठोकल्या. आरोपी मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचे सांगितले जात असले, तरी पोलीस तपासाअंतीच याबाबत अधिकृत पुष्टी केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पोलिसांच्या ताब्यात असताना आरोपीने स्वतःला दुखापत करून घेतल्याने त्याला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पीडित बालिकेची वैद्यकीय तपासणी करण्यात येत असून कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

रुग्णालयाबाहेर तणाव

लोकप्रतिनिधींची धाव घटनेची माहिती मिळताच सायंकाळी ५ वाजेपासूनच नागरिकांनी सिव्हिल हॉस्पिटलबाहेर जमायला सुरुवात केली. आरोपीला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी करत जमाव अधिकच आक्रमक झाला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून रुग्णालयात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

यावेळी शिवसेना आमदारांच्या पत्नी डॉ. अश्विनी भोंडेकर, , सचिन बागडे, सोनू खोब्रागडे, यांसह अनेक लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. “हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून १५ दिवसांच्या आत आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे,” अशी मागणी आंदोलकांनी केली.

एसडीएम घटनास्थळी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता (Dean) डॉ. सुजाता दूधगावकर या वेळेवर रुग्णालयात न पोहोचल्याने नागरिकांचा संताप अधिकच वाढला. संतप्त जमावाने त्यांच्या निलंबनाची मागणी केली. रात्री ९ वाजेच्या सुमारास भंडारा उपविभागीय अधिकारी (SDM) माधुरी तीखे रुग्णालयात पोहोचल्या. त्यांनी शहर पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी यांच्यासह आंदोलकांशी चर्चा केली आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.

तपास सुरू सध्या रुग्णालय परिसरात तणावपूर्ण शांतता असून अतिरिक्त पोलीस बळाचा वापर करण्यात आला आहे. चिमुरड्यांच्या सुरक्षेचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. “आरोपीवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल आणि पुराव्यांच्या आधारे तपास पूर्ण केला जाईल,” असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.

Popular Articles