spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

केंद्र समन्वयक गजानन चौधरी यांच्या सेवापूर्ती सोहळ्यात मान्यवरांकडून कर्तृत्वाचा गौरव ! 

मोर्शी, तालुका प्रतिनिधी :- अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, मोर्शी आणि चौधरी-वडतकर परिवाराच्या वतीने अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ, अमरावतीचे जिल्हाध्यक्ष तथा केंद्र समन्वयक गजानन वामनराव चौधरी यांच्या सेवापूर्ती निमित्त आयोजित करण्यात आलेला ‘सेवापूर्ती गौरव सोहळा’ रविवारी परशुराम मंगल कार्यालय, अमरावती रोड, मोर्शी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण व भावनिक वातावरणात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष किरण पाटील होते. विशेष अतिथी म्हणून राज्य माहिती आयुक्त, अमरावती तथा माजी जिल्हाधिकारी, नागपूर रविंद्र ठाकरे, माजी उपवनसंरक्षक अशोकराव कविटकर, राज्यकर उपआयुक्त, नागपूर कविता सतिश मोहोद आणि गटविकास अधिकारी, पंचायत समिती मोर्शी स्वप्निल मगदूम उपस्थित होते.

प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हाधिकारी मनोहर कडू, माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कापडे, माजी गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती वरुड निळकंठराव यावले, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती मोर्शी डॉ. नितीन उंडे, माजी उपशिक्षणाधिकारी, अमरावती पंडित  पंडागळे आणि अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा सरचिटणीस सुभाष सहारे यांची उपस्थिती लाभली.

मान्यवरांच्या मनोगतातून चौधरी यांचा गौरव

अध्यक्षीय मनोगतात किरण पाटील यांनी चौधरी यांच्या सेवापूर्तीचा प्रसंग हा शिक्षक समाजासाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचा क्षण असल्याचे सांगत त्यांच्या प्रदीर्घ सेवेला शुभेच्छा दिल्या.

रविंद्र ठाकरे यांनी चौधरी यांच्या कार्यातील शैक्षणिक तळमळ, सकारात्मक दृष्टिकोन आणि प्रशासनाशी असलेला समन्वय यांचा गौरव केला. शिक्षक म्हणून काम करताना समाजाशी जोडले जाणे ही त्यांची विशेष ओळख असल्याचे त्यांनी नमूद केले. अशोकराव कविटकर यांनी चौधरी यांच्या सामाजिक बांधिलकीचा आणि लोकसहभागातून केलेल्या कामांचा विशेष उल्लेख केला. शाळा आणि समाज यांच्यातील नाते दृढ करणारे त्यांचे कार्य अनुकरणीय असल्याचे त्यांनी सांगितले.

गटविकास अधिकारी स्वप्निल मगदूम यांनी चौधरी यांच्या अनुभवाचा आणि मार्गदर्शनाचा शैक्षणिक क्षेत्राला मोठा लाभ झाल्याचे सांगत त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

मनोहर कडू यांनी चौधरी यांच्या प्रामाणिकपणा, माणुसकी आणि कार्यनिष्ठेचा गौरव करत पदापेक्षा कामातून व्यक्तिमत्त्वाची उंची सिद्ध करणारे ते व्यक्तिमत्त्व असल्याचे सांगितले.

प्रमोद कापडे यांनी त्यांच्या शैक्षणिक तळमळीचे आणि नावीन्यपूर्ण विचारांचे कौतुक केले. ग्रामीण शाळांमध्ये सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले.निळकंठ यावले यांनी शिक्षक, मुख्याध्यापक आणि केंद्रस्तरीय जबाबदाऱ्या पार पाडताना चौधरी यांनी दाखविलेल्या नेतृत्वगुणांचा गौरव केला. नितीन उंडे यांनी चौधरी यांच्या शैक्षणिक अनुभवाचा आणि मार्गदर्शक भूमिकेचा उल्लेख करत त्यांच्या सेवेमुळे शिक्षकांना सातत्याने दिशा मिळाल्याचे सांगितले. पंडित पंडागळे यांनी चौधरी यांच्या शैक्षणिक प्रयोगशीलतेचे आणि विद्यार्थ्यांप्रती असलेल्या तळमळीचे कौतुक केले. सुभाष सहारे यांनी शिक्षक संघटनेतील चौधरी यांच्या योगदानाचा आढावा घेत शिक्षकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने केलेल्या कार्याला अभिवादन केले.

विद्यार्थिनी निधीचे मनोगत ठरले भावस्पर्शी

कार्यक्रमातील विशेष भावनिक क्षण म्हणजे चौधरी यांच्या विद्यार्थिनी कुमारी निधी हिने व्यक्त केलेले मनोगत. चौधरी सरांनी विद्यार्थ्यांना दिलेले प्रेम, मार्गदर्शन आणि आपुलकी यांचा उल्लेख करत तिने त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. विद्यार्थिनीच्या मनातून व्यक्त झालेल्या या भावना उपस्थितांच्या विशेष पसंतीस उतरल्या.

गजाननराव चौधरी यांचा यावेळी सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. सेवापूर्तीचा हा सोहळा त्यांच्या कर्तृत्वाला दिलेला सन्मान नसून शिक्षक, सहकारी, विद्यार्थी आणि समाजाच्या मनातील कृतज्ञतेची अभिव्यक्ती असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन दत्तप्रसाद भेले यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिल उर्फ अण्णासाहेब कडू, अध्यक्ष गजानन निचत, सरचिटणीस गणेश जोशी, ज्ञानेश्वर बाळसराफ, चक्रधर ठवळी, वासुदेव घाटोळ यांच्यासह शिक्षक बांधव आणि चौधरी-वडतकर परिवाराने विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. भावपूर्ण वातावरणात संपन्न झालेल्या या सोहळ्याने गजानन चौधरी यांच्या सेवापूर्तीला कृतज्ञतेचा आणि स्नेहाचा संस्मरणीय मुकुट लाभला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.