– बाभूळगाव तालुक्यातील तांबा व वाटखेड येथे धाड; अवैध रेती साठा आणि ट्रक जप्त
यवतमाळ :- जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध रेती उत्खनन आणि साठेबाजीविरोधात जिल्हाधिकारी विकास मीना यांनी ॲक्शन मोडवर येत स्वतः फिल्डवर उतरून कारवाई तीव्र केली आहे. त्यांनी बाभूळगाव तालुक्यातील तांबा आणि वाटखेड परिसरात अचानक धाड टाकून अवैध रेतीचा साठा आणि एक ट्रक जप्त करण्यात आला.
पाहणीदरम्यान संबंधित ठिकाणी नियमबाह्य पद्धतीने रेतीचा साठा करण्यात आल्याचे निदर्शनास आले. यानंतर महसूल विभागाने तातडीने कारवाई करत अवैध साठा जप्त केला. तसेच रेती वाहतुकीसाठी वापरण्यात येणारा एक ट्रकही ताब्यात घेण्यात आला आहे.
यावेळी जिल्हाधिकारी विकास मीना यांनी अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांना कठोर शब्दांत इशारा दिला. तालुकास्तरावरील तहसीलदार आणि पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात प्रभावी नियंत्रण ठेवावे, अन्यथा जबाबदार अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, जप्त करण्यात आलेली रेती शासनाच्या घरकुल योजनांतील लाभार्थ्यांच्या उपयोगासाठी उपलब्ध करून देण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. यामुळे गरीब आणि गरजू कुटुंबांच्या घरबांधणीस मदत होणार असून जप्त मालमत्तेचा समाजहितासाठी उपयोग होणार आहे.
जिल्हा प्रशासनाने अवैध रेती उत्खनन, वाहतूक आणि साठेबाजीविरोधातील मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले असून, अशा प्रकारच्या बेकायदेशीर कामांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाईचा इशाराही दिला आहे.



