– जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सावळी (खुर्द) येथे पर्यावरण जनजागृती व वृक्षारोपण
नागपूर :- कळमेश्वर येथे ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, नागपूर येथील विद्यार्थ्यांनी सावळी (खुर्द) गावात पर्यावरण जनजागृती व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत कार्यरत कृषिदूत विद्यार्थ्यांनी ५ जून रोजी हा उपक्रम राबवून पर्यावरण संरक्षणाचा संदेश ग्रामस्थांपर्यंत पोहोचविला. पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करताना कृषिदूतांनी गावातील नागरिकांशी संवाद साधून प्रदूषण नियंत्रण, नैसर्गिक संसाधनांचे जतन, पर्यावरणीय समतोल राखणे आणि शाश्वत विकासासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती दिली. तसेच पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अवलंब करून भावी पिढ्यांसाठी स्वच्छ व हरित पर्यावरण निर्माण करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी गावातील विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. तसेच वनसंवर्धन, जलसंधारण आणि घनकचरा व्यवस्थापना बाबत जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमात ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत पर्यावरण संरक्षणासाठी सामूहिक शपथ घेतली. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सरपंच प्रियांका चोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन केले. तसेच ग्रामसेवक आकांक्षा लांजेवार यांच्या प्रोत्साहनामुळे कार्यक्रम प्रभावीपणे पार पडला. त्यांच्या योगदानाबद्दल कृषिदूतांनी विशेष आभार व्यक्त केले. पर्यावरण संरक्षणाची सामूहिक जबाबदारी स्वीकारत गावकऱ्यांनी या उपक्रमाचे स्वागत केले व विद्यार्थ्यांच्या कार्याचे कौतुक केले.



