spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

खा. डॉ. प्रशांत पडोळेंचा दिल्लीत ‘धडाका’! नितीन गडकरींची भेट घेत महामार्गांतील भ्रष्टाचार आणि गुणवत्तेवर ओढले ताशेरे

– “सिमेंट सडक नीती बंद करा”; भंडारा-गोंदियातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत जनआंदोलनाचा इशारा

भंडारा, नवी दिल्ली :- संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना भंडारा-गोंदियाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी मतदारसंघातील ज्वलंत प्रश्नांवर आक्रमक पवित्रा घेतला आहे. “सिमेंट सडक नीती बंद करा, जनतेचा आवाज बुलंद करा!” अशी घोषणा देत डॉ. पडोळे यांनी थेट केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची संसदेत भेट घेतली. या भेटीत त्यांनी महामार्गांच्या कामातील भ्रष्टाचार, निकृष्ट दर्जा आणि ई-२० पेट्रोलमुळे होणारे नुकसान यावर घणाघाती हल्ला चढवला.

रस्ते की मृत्यूचा सापळा? खा. डॉ. प्रशांत पडोळे यांनी नितीन गडकरी यांच्याशी संवाद साधताना भंडारा-गोंदिया मतदारसंघात NHAI (राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण) अंतर्गत बांधण्यात आलेल्या ओव्हरब्रिज आणि महामार्गांच्या निकृष्ट दर्जाचा पर्दाफाश केला. “रस्त्यांची दुरवस्था आणि ठिकठिकाणी पडलेले जीवघेणे खड्डे यामुळे अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले असून रोज सामान्यांचे बळी जात आहेत,” असे सांगत त्यांनी मंत्र्यांचे लक्ष वेधले. भ्रष्ट कंत्राटदार आणि जबाबदारी झटकणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.

NHAI च्या निष्क्रियतेविरोधात जनआंदोलन मतदारसंघातील मुख्य रस्ते आणि पुलांवरील खड्डे बुजवण्यासाठी NHAI च्या अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क करूनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. प्रशासनाच्या या आडमुठ्या धोरणामुळे संताप व्यक्त करत, “लवकरच या प्रश्नावर तीव्र जनआंदोलन छेडले जाईल,” असा इशारा डॉ. पडोळे यांनी दिला आहे.

‘ई-२०’ पेट्रोल बंद करण्याची मागणी रस्त्यांच्या प्रश्नासोबतच डॉ. पडोळे यांनी इंधनाच्या मुद्द्यावरही सरकारला धारेवर धरले. “पेट्रोलमध्ये इथेनॉलच्या सक्तीच्या वापरामुळे (E20) बहुतांश वाहने खराब होत आहेत. यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक नुकसान होत असून देशातील अनेक संघटना याला विरोध करत आहेत,” असे त्यांनी निदर्शनास आणून दिले. सरकारने E20 पेट्रोल त्वरित बंद करावे आणि पेट्रोलच्या वाढत्या किमती कमी करून जनतेला दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी केली.

खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे आता केंद्र सरकार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण काय पावले उचलणार, याकडे संपूर्ण विदर्भाचे लक्ष लागले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.