नागपूर :- मनपाच्या शिक्षण विशेष समितीच्या सभापती संतोषदेवी लढ्ढा यांनी अन्नामृत व बचत गट मिड-डे मील योजनेअंतर्गत कार्यरत संस्थांच्या अध्यक्षांसोबत बैठक घेतली. बैठकीत सभापतींनी विविध मुद्यावर सविस्तर व महत्त्वपूर्ण चर्चा करीत निर्देश दिले. याप्रसंगी उपशिक्षणाधिकारी सीमा खोब्रागडे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान विद्यार्थ्यांना वेळेवर, स्वच्छ, पौष्टिक व गुणवत्तापूर्ण अन्न उपलब्ध करून देण्याबाबत सखोल चर्चा करण्यात आली. सर्व संबंधित संस्थांना स्पष्ट निर्देश देण्यात आले की अन्नाची गुणवत्ता, स्वच्छता, पोषणमानके व वितरण प्रक्रियेत कोणतीही निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही. प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत वेळेवर अन्न पोहोचावे व वितरण प्रक्रिया शिस्तबद्ध व सुयोग्य पद्धतीने पार पडावी, यावर विशेष भर देण्यात आला.
या प्रसंगी उपशिक्षणाधिकारी सीमा खोब्रागडे यांनी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक मार्गदर्शन केले. शिक्षण सभापती संतोषदेवी दीपक लढ्ढा यांनी सर्व संस्थांना स्पष्टपणे निर्देश दिले की विद्यार्थ्यांच्या आरोग्य व पोषणाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. संतोष लढ्ढा यांनी पुढे असेही नमूद केले की आगामी काळात नियमित पाहणी व आढावा बैठकींद्वारे कामांची गुणवत्ता तपासली जाईल. सर्वांच्या उपस्थितीत ही बैठक अत्यंत सकारात्मक व परिणामकारक ठरली असून, मिड-डे मील योजनेच्या सुरळीत, पारदर्शक व प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक दिशा-निर्देश देण्यात आले.








