spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कामठी तालुक्यातील अंबाडी गावात वृद्धेचा सर्पदंशाने मृत्यू

अंधश्रद्धेच्या विळख्यात आणखी एक बळी
 
कामठी ७ :  “मंत्रांनी साप निघत नाही, वेळेवर उपचारांनी जीव वाचतो”  ही बाब सातत्याने सांगितली जात असली, तरी अंधश्रद्धेच्या फासातून काही लोक अजूनही बाहेर पडायला तयार नाहीत. याचीच एक हृदयद्रावक घटना कामठी तालुक्यातील अंबाडी गावात मंगळवारी घडली, जेव्हा चंद्रभागा भुसारी (वय ८०) या वृद्धेचा सर्पदंशानंतर योग्य वेळी उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला.

मंगळवारी सकाळी सुमारास चंद्रभागा भुसारी आपल्या अंगणात काही काम करीत असताना, पाण्याच्या ड्रमामागे दडलेल्या सुमारे चार फूट लांबीच्या विषारी नागाने त्यांना दंश केला. सुरुवातीला उंदीर चावला असेल, असा गैरसमज करून त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, काही वेळातच गावातील एका महिलेला ड्रमामागे साप दिसला आणि गावात खळबळ उडाली.

पण वेळ निघून गेली होती..

या बाबत गावातील सर्पमित्र रोशन सहारे यांना कळवण्यात आले. त्यांनी तत्काळ घटनास्थळी येऊन सापाला सुरक्षितपणे पकडले. त्यांनी वृद्धेला दवाखान्यात नेण्याचा आग्रह धरला. पण दुर्दैव असे की, तोपर्यंत वृद्धेला गावातील मंदिरात नेऊन मंत्रोपचार सुरू झाले होते. त्यामुळे वैद्यकीय उपचारासाठी आवश्यक असलेला वेळ वाया गेला होता.

मेडिकलकडे धाव घेतली पण…

वृद्धेची प्रकृती झपाट्याने खालावत असताना अखेर त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथून पुढे मेडिकल हॉस्पिटलला पाठवण्यात आले.  मात्र, वेळेवर उपचार न मिळाल्याने चंद्रभागा यांचा मृत्यू झाला.

 पुन्हा एकदा अंधश्रद्धेचा बळी

या दुर्दैवी घटनेनंतर सर्पमित्र आणि वाइल्डलाइफ सोसायटीकडून पुन्हा एकदा आवाहन करण्यात आले आहे की, सर्पदंशाच्या कोणत्याही घटनेत मंत्र-तंत्र, झाडांची पाने किंवा गंडेदोरे यांवर वेळ घालवू नका. लगेच आरोग्य केंद्र गाठून वैद्यकीय उपचार घ्या.
सर्पदंश झाल्यास तत्काळ रुग्णास जवळच्या शासकीय रुग्णालयात घेऊन जा.
सर्पमित्रांशी संपर्क साधा मंत्रोपचार, झाडांची पाने किंवा गंडेदोऱ्यांवर विश्वास ठेवू नका, या गोष्टी वेळ वाया घालवतात आणि जीव धोक्यात येतो.
अंधश्रद्धेपासून बाहेर पडा.
चंद्रभागा भुसारी यांचा मृत्यू ही एक व्यक्तीची नाही, तर समाजाच्या चुकीच्या विश्वास व्यवस्थेची शोकांतिका आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून सर्व स्तरांवर जनजागृती आणि जबाबदारीचे पाऊल उचलणे ही काळाची गरज असल्याचे वारंवार सांगितल्या जात असले तरी सुद्धा अनेक जण अंधश्रद्धेच्या आहारी जातात आणि जीव गमावतात

Popular Articles