spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कुही तालुक्यातील 24 ग्रामपंचायतीच्या निवडणुका लांबणीवर जाण्याची शक्यता

– 11 फेब्रुवारी ला मुदत संपणार : प्रशासक पाहणार ग्रामपंचायतीचा कारभार…

साळवा :- कुही तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लांबत चाललेल्या निवडणुकांमुळे मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकाही लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. येत्या 11 फेब्रुवारी ला कुही तालुक्यातील 24 ग्रामपंचायतींच्या मुदती संपणार आहेत. त्यांच्या निवडणुका किमान सहा महिने लांबणीवर पडण्याची शक्यता प्रशासकीय पातळीवर व्यक्त होत आहे. निवडणुका लांबल्याने ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्तीची शक्यता आहे. येत्या फेब्रुवारी महिन्यात तालुकाभरात ग्रामपंचायतींची पाच वर्षाची मुदत संपणार आहे. तेथे निर्धारित वेळेत नवे निवडून येण्यासाठी डिसेंबर महिन्यातच ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होणे अपेक्षित आहे, पण सध्या राज्यात नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्या आणि महापालिकांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू आहे. या सर्व निवडणुका ३१ जानेवारीअखेर संपविण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. निवडणूक आयोगाच्या दृष्टीने हा कालावधी अपुरा आहे. त्यातच ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे नवे ओझे अंगावर घेण्याची आयोगाची परिस्थिती नाही हे स्पष्ट दिसत आहे. निवडणुका लांबणीवर टाकण्याशिवाय पर्याय उरणार नाही.

सरपंचपदासाठी मोर्चेबांधणी सुरू

दोनच महिन्यांत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीत इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. विशेषतः थेट सरपंचपदावर अनेकांचा डोळा असून पहिल्या टप्प्यात समाजमाध्यमांतून त्यांनी मतदारांवर फासे फेकायला सुरुवात केली आहे.

…तर ग्रामपंचायतीच्या निवडणुका ऐन लग्नसराईतच

फेब्रुवारीतील निवडणुका लांबल्यास त्या आगामी किमान तीन ते चार महिने घेता येणार नाहीत. मार्चपासून शाळा-महाविद्यालयांच्या परीक्षांचा हंगाम सुरू होतो. त्यामुळे निवडणुकीसाठी शाळांतील वर्गखोल्या आणि शिक्षक उपलब्ध होणार नाहीत. परीक्षा संपल्यावर एप्रिल-मे महिन्यात निवडणुका घेता येवू शकते.

निवडणुका का लांबणार?

ग्रामपंचायतीच्या निवडणुका किमान 3-4 महिन्यांसाठी लांबणीवर पडण्याची चिन्हे दिसत आहेत, कारण प्रभाग रचना, आरक्षण प्रक्रिया आणि मतदार याद्या पूर्ण होण्यास वेळ लागणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात मुदतवाढ मागितली असून, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका प्रलंबित असल्याने ग्रामपंचायतीवरही परिणाम होत आहे.

मुदत संपणाऱ्या कुही तालुक्यातील 24 ग्रामपंचायती

डोडमा, खोकरला, राजोला, विरखंडी, म्हसली, बानोर, ससेगाव, हरदोली(राजा), चितापूर, मुसळगाव, बोरी (नाईक), परसोडी राजा, हरदोली (नाईक), राजोली, वेळगाव, क-हांडला, वडेगाव काळे, चापेगडी, तारणा, भटरा, साळवा, पारडी ,कुजबा, किन्ही…

विद्यमान सरपंचांना संधी..

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ नुसार प्रशासकाला सरपंचाचे सर्व अधिकार-कर्तव्य मिळतात, जसे ग्रामसभा अंमलबजावणी व कर्मचारी नियंत्रण. निवडणुका लांबल्यास ज्याप्रमाणे 2018 ला नागपूर जिल्हा परिषद अध्यक्ष आणि सदस्यांना मुदतवाढ मिळाली होती, त्याचप्रमाणे विद्यमान सरपंचांना प्रशासक पदासाठी प्राधान्याने (मुदतवाढ) संधी देण्यात यावी, ज्यामुळे त्यांचे पद सुरू राहील, आणि गावातील अपूर्ण कामे पुर्ण करण्यास सोपे जाईल.ज्यामुळे दैनंदिन कामकाज सुरळीत चालेल.

– जितेंद्र गोंडाणे,सोशल मीडिया राज्य प्रमुख राष्ट्रीय प्रधान मुखीया सरपंच संघ.

Popular Articles