कुही ९ – किसान क्लबचे जिल्हाध्यक्ष आकाश भोयर यांच्या नेतृत्वात कुही तहसिल कार्यालयात नायब तहसिलदार मनिषा देशमुख यांना निवेदन देण्यात आले.आंभोरा परिसरात सुरू असलेल्या पर्यटन प्रकल्पांमध्ये स्थानिक भुमिपुत्र व गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांना रोजगाराची हमी द्यावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी अत्यल्प मोबदल्यात सरकारला जमीन दिली, मात्र आज त्या जमिनीवर हजारो कोटींचे प्रकल्प उभे राहत असूनही स्थानिक युवकांना रोजगाराची संधी मिळत नाही, असा संताप या वेळी व्यक्त करण्यात आला.
निवेदनात स्पष्ट करण्यात आले की, पर्यटन प्रकल्पांमध्ये किमान ८० टक्के रोजगार प्रकल्पग्रस्त व स्थानिक भुमिपुत्रांना द्यावा आणि त्याबाबत शासनाने लिखित हमी द्यावी. त्यानंतरच प्रकल्प पूर्णत्वास न्यावेत. अन्यथा सर्व पर्यटन प्रकल्प बंद पाडण्याचा इशारा देण्यात आला.
या निवेदनाची पंधरा दिवसांच्या आत दखल घेतली नाही तर किसान क्लब, जिल्हा नागपूर व गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या वतीने कुही तहसिल कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.




