Home Latest News शेतमजुराचा संशयास्पद मृत्यू : चिंचेच्या झाडाला लटकलेला मृतदेह

शेतमजुराचा संशयास्पद मृत्यू : चिंचेच्या झाडाला लटकलेला मृतदेह

0
52
मांढळ शिवारातील घटना; नागरिकांमध्ये चर्चेला ऊत  

मांढळ ९ : मांढळ शिवारात रविवारी (दि. ७) रात्री चिंचेच्या झाडाला शेतमजुराचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, मृत्यूबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

मृताचे नाव रमेश नारायण भरणे (वय २७, रा. भोलाहुडकी, मांढळ) असे आहे. तो मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. रविवारी रात्री साडेसातच्या सुमारास तो घरी जाताना अनेकांनी पाहिला. याच वेळी गणपती विसर्जनासाठी सज्ज होत असलेल्या तरुणांना त्याने मदतही केली.

यानंतर अल्पावधीतच मांढळ-वग बायपास रोडवरील भय्या निर्गुळकर यांच्या गोठ्याजवळील चिंचेच्या झाडाला त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. विशेष म्हणजे त्याचे पाय जमिनीपासून १० ते १२ फूट उंचावर होते. गळफासासाठी वापरलेला बैल बांधण्याचा दोर (कासरा) गळ्यात घट्ट आवळलेला नव्हता. यामुळे ही आत्महत्या नसून, हत्या असावी, असा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

घटनेची माहिती मिळताच कुही पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कुही ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. याप्रकरणी गुन्हा नोंद करून कुही पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रशांत काळे,यांच्या मार्गदर्शणात तपास सुरु आहे