– वन विभागाने तातडीने प्रभावी उपाययोजना करावी : ग्रामस्थ
सचिन चौरसिया, रामटेक :- तालुक्यातील कांद्री येथे शेतात काम करत असतांना दुपारी १२ वाजेच्या सुमारास रानडुकराच्या हल्ल्यात एक वृद्ध शेतकरी गंभीर जखमी झाला. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कांद्री येथील शेतकरी शिवराम झिबल शिवणकर (वय ७०) मंगळवार (दि.७) ला दुपारी १२ वाजताच्या सुमारास फुटाळा परिसरातील आपल्या शेतात धान पिकाला पाणी देण्यासाठी गेले असता अचानक रानडुकराच्या कळपातील एका रानडुकराने त्यांच्यावर हल्ला चढविला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. आजूबाजूच्या शेतात कोणीही नसल्याने जखमी अवस्थेत ते मुख्य रस्त्याकडे धाव घेतली. शिवरकर हे जखमी अवस्थेत रोडवर गावातील एका व्यक्तीच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ त्यांना दुचाकीवरून वन विभाग कार्यालय कांद्री येथे येऊन घटनेची माहिती दिली. जखमी अवस्थेत त्यांना तत्काळ उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र जाम येथे उपचारासाठी दाखल केले. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी व ग्रामस्थांनी वनविभागाशी संपर्क साधला असून वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले आहेत. कांद्री परिसरातआता रानडुकरांच्या हल्ल्याच्या घटनांमुळे शेतकरी अधिकच धास्तावले आहेत. वन विभागाने तातडीने प्रभावी उपाययोजना करून शेतकऱ्यांच्या सुरक्षितेसाठी ठोस पावले उचलावीत अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. वनविभागाने परिसरात पाहणी करून नागरिकांनी शेतात काम करताना सतर्क राहावे, असे आवाहन केले आहे.




