spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

डिजिटल शेतीशाळेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे

– २५ मे पासून ऑनलाईन वर्गांना सुरुवात

– पाणी फाऊंडेशन, कृषि विभाग, पोक्रा व उमेद यांचा संयुक्त उपक्रम

– झूम व युट्यूबद्वारे थेट सहभागाची संधी

यवतमाळ :- कृषि आयुक्त कार्यालय, पाणी फाऊंडेशन, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोक्रा), ‘उमेद’ अभियान आणि राज्यातील प्रमुख कृषि विद्यापीठे यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांसाठी २५ मे २०२६ पासून ‘डिजिटल शेतीशाळा २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. या डिजिटल शेतीशाळेच्या माध्यमातून खरीप हंगामातील विविध पिकांचे आधुनिक तंत्रज्ञान थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्यात येणार असून, जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या शेतीशाळेमध्ये दररोज वेगवेगळ्या पिकांनुसार तज्ञ शास्त्रज्ञ आणि कृषि अधिकारी शेतकऱ्यांना थेट मार्गदर्शन करणार आहेत. शेतकऱ्यांच्या मनात असणाऱ्या तांत्रिक शंकांचे निरसन झूमच्या चॅट बॉक्समध्ये किंवा युट्युबच्या कमेंट सेक्शनमध्ये टाईप करुन करता येणार आहे.

शेतकऱ्यांना घरबसल्या किंवा गावातील एकत्र ठिकाणी डिजिटल शेतीशाळेत सहभागी होता यावे यासाठी पिकांचे व वेळेचे नियोजन करण्यात आले आहे.

गावागावांत होणार प्रक्षेपणाची व्यवस्था

शेतकऱ्यांना एकत्र आणण्यासाठी ग्रामपंचायत, शाळा किंवा स्थानिक मंदिरांमध्ये संगणक, लॅपटॉप, मोबाईल अथवा प्रोजेक्टरच्या माध्यमातून या शेतीशाळेचे थेट प्रक्षेपण करण्याचे निर्देश क्षेत्रीय यंत्रणेला देण्यात आले आहेत. तसेच गावातील कृषिताई, ग्राम कृषि विकास समिती सदस्य आणि स्वयंसेवक या कामी पुढाकार घेणार आहेत. स्थानिक कृषि सेवा केंद्रांवरही हे प्रक्षेपण पाहता येईल.

झूम ॲप, युट्यूबवर थेट प्रक्षेपण

या डिजिटल शेतीशाळेत झूमद्वारे सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या किंवा आपल्या परिचित व्यक्तीच्या मोबाईल, कम्प्यूटर किंवा लॅपटॉपमध्ये प्ले स्टोरवरुन झूम ॲप डाऊनलोड करावे अथवा गुगलवर झूम लिंक ओपन करुन मिटिंग आयडी व पासकोड समाविष्ट करुन सहभागी व्हावे. तसेच युट्यूबवर थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी कृषी विभागाच्या पाणी फाऊंडेशनच्या (@PaaniFoundation) या चॅनलला भेट देवून सहभागी व्हावे.

खरीप हंगामात पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी दररोज या डिजिटल शेतीशाळेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. – जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, यवतमाळ


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.