spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी सदस्यांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

यवतमाळ :- राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील बिगर व अंशतः अनुसूचित क्षेत्रातील सन २०२४ व २०२५ मध्ये मुदत संपलेल्या व सन २०२६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या, नवनिर्मित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्यांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

या आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमानुसार ८ जून २०२६ पर्यंत आरक्षणाची सोडत काढण्याकरीता विशेष ग्रामसभेची सूचना देणे, १२ जून २०२६ पर्यंत विशेष ग्रामसभा बोलवून तहसिलदार यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली आरक्षणाची सोडत काढणे (अनु. जाती, अनु. जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, अनु. जाती महिला, अनु. जमाती महिला, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिला), १७ जून २०२६ पर्यंत प्रभागनिहाय आरक्षण प्रारुप अधिसूचनेला (नमुना ब) जिल्हाधिकारी यांनी मान्यता देणे, १९ जून २०२६ रोजी प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारुप प्रसिध्द करणे, प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीबाबत हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी हा १९ ते २५ जून २०२६ असणार आहे. ३ जुलैपर्यंत उपविभागीय अधिकारी यांनी प्राप्त हरकती विचारात घेऊन अभिप्राय देणे, ८ जुलैपर्यंत उपविभागीय अधिकारी यांचे अभिप्राय विचारात घेऊन अंतिम अधिसूचनेस (नमुना अ) जिल्हाधिकारी यांनी मान्यता देणे, १० जुलै रोजी जिल्हाधिकारी यांनी मान्य केलेल्या अंतिम प्रभाग रचनेला (नमुना अ) व्यापक प्रसिध्दी देणे असा हा ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्यांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी जाहीर केला आहे.

तसेच राज्य निवडणूक आयोगाने बिगर व अंशतः अनुसूचित क्षेत्रात समाविष्ट ग्रामपंचायतींच्या सर्व निवडणुकांमध्ये “ग्रामपंचायत (बिगर व अंशतः अनुसूचित क्षेत्रात असलेल्या) सार्वत्रिक निवडणूक (आरक्षण निश्चिती व आरक्षण चक्रानुक्रमे फिरविणे) आदेश, २०२६” या सुधारित आदेशाचे पालन करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त यांनी दिले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.