spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

नागपूर पदवीधर मतदार संघासाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध

– विभागात एकूण 1 लाख 59 हजारांवर मतदारांची नोंद

नागपूर :-  विभागातील पदवीधर मतदार संघासाठी १ नोव्हेंबर २०२५ या अर्हता दिनांकावर आधारित नव्याने मतदार यादी तयार करण्याच्या कार्यक्रमानुसार आज विभागातील १ लाख ५९ हजार ९२५ मतदारांची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आल्याचे नागपूर विभागाच्या मतदार नोंदणी अधिकारी तथा विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

मतदार नोंदणीची प्रक्रिया यावर्षी निवडणूक कार्यक्रम जाहीर होईपर्यंत सुरु राहणार असून मागील निवडणुकीपेक्षा यावेळी जास्त मतदारांची नोंद होईल असा विश्वास व्यक्त करत जास्तीत-जास्त पदवीधरांनी मतदार नोंदणी करावी, असे आवाहन श्रीमती बिदरी यांनी केले आहे.

विधानपरिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकीच्या नागपूर विभागातील पदवीधर मतदार संघाचे सदस्य अभिजित वंजारी हे ६ डिसेंबर २०२६ रोजी निवृत्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर पदवी निकाल लागल्यापासून १ नोव्हेंबर २०२५ पर्यंत ३ वर्ष पूर्ण झालेल्या पदवीधरांसह सद्या मतदार यादीत नाव समाविष्ट असलेल्या सर्व पदवीधरांसाठी ३० सप्टेंबर २०२५ पासून नव्याने मतदार नोंदणी करण्यास सुरुवात झाली. ३ डिसेंबर २०२५ रोजी पहिली प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली यानुसार ६ नोव्हेंबर २०२५ पर्यंत विभागातील ६ जिल्ह्यांमधून १ लाख १० हजार ९५६ अर्ज प्राप्त झाले होते. पदवीधरांकडून ३ ते १८ डिसेंबर २०२५ पर्यंत दावे व हरकती घेण्यात आले. या हरकती स्वीकारुन निकाली काढण्यात आल्या व १२ जानेवारी २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

जिल्हानिहाय झालेल्या मतदारांची नोंद

नागपूर विभागील ६ जिल्ह्यांमध्ये एकूण २५६ मतदान केंद्रांवर एकूण १ लाख ५९ हजार ९२५ पदवीधरांनी नोंदणी केली आहे. नागपूर जिल्ह्यात १ ते १३९ मतदान केंद्रावर ७६ हजार ८७० अंतिम मतदारांची नोंद झाली. भंडारा जिल्ह्यात १४० ते १५७ मतदान केंद्रावर १५ हजार २४१ मतदारांची नोंद झाली. गोंदिया जिल्ह्यात १५८ ते १७४ मतदान केंद्रावर १७ हजार २९१ मतदारांची , वर्धा जिल्ह्यात १७५ ते २०३ मतदान केंद्रावर १४ हजार ६७०, चंद्रपूर जिल्ह्यात २०४ ते २३९ मतदान केंद्रावर २४ हजार ३६० आणि गडचिरोली जिल्ह्यात २४० ते २५६ मतदान केंद्रावर ११ हजार ४९३ मतदारांची नोंद करण्यात आली आहे.

मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया यावर्षी नागपूर पदवीधर मतदार संघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होईपर्यंत नमुना १८ अर्ज तहसील कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय व विभागीय आयुक्त कार्यालयात स्वीकारले जाणार आहेत. १२ जानेवारी २०२६ नंतर प्राप्त अर्ज हे पुरवणी स्वरूपात अंतिम यादी सोबत एकत्रितपणे संलग्न करण्यात येतील, असे बिदरी यांनी सांगितले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.