spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

पहिले ‘पोर्टा केबिन’ स्वरूपातील आयुष्मान आरोग्य मंदिर कार्यान्वित

नागपूर :- राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानामार्फत नागपूर महानगरपालिका आरोग्य विभागाअंतर्गत नागरिकांना प्राथमिक आरोग्य सेवा सुलभरित्या उपलब्ध करून देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. याच अनुषंगाने१५ व्या वित्त आयोग अंतर्गत विशेष तरतुदीनुसार शहरातील पहिले पोर्टा केबिन स्वरूपातील आयुष्मान आरोग्य मंदिर झिंगाबाई टाकळी येथील संत ज्ञानेश्वर सोसायटी येथे यशस्वीरीत्या कार्यान्वित करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत एकूण ११३ आयुष्मान आरोग्य मंदिरांना मंजुरी मिळाली असून, त्यापैकी ८८ आरोग्य मंदिरे सध्या कार्यान्वित करण्यात आले आहेत.

या केंद्रामार्फत परिसरातील नागरिकांना प्राथमिक उपचार, सर्वसाधारण तपासण्या, औषध वितरण, रोगप्रतिबंधक सेवा, माता-बाल आरोग्य सेवा तसेच आरोग्य जनजागृती अशा विविध सेवा सुलभ आणि मोफत प्रदान केल्या जातील. पोर्टा केबिन स्वरूपातील ही सुविधा जलद उभारणी, लवचिक रचना आणि कमी वेळेत वापरात येण्यास सक्षम असल्याने नागरिकांना तत्काळ आरोग्यसेवा उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार आहे. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक (पुरुष) व स्टाफ नर्स, परिचर व अटेंडंट हे सर्व रुग्णसेवेसाठी आयुष्मान आरोग्य केंद्र इथे उपलब्ध असतील. औषधी आरोग्य विभागाद्वारे पुरविण्यात येत आहेत. आवश्यक निवडक रक्त तपासणी ही एचएलएल मार्फत करण्यात येईल.

नागपूर महानगरपालिका शहरातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी आणि सर्वसमावेशक आरोग्यसेवा प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी कटिबद्ध आहे. उर्वरित मंजूर आरोग्य मंदिरांचे काम प्रगतीपथावर असून ती लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. नागरिकांचा आरोग्यविषयक दर्जा उंचावणे हे प्राथमिक ध्येय राहील.

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी, अति.आयुक्त वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनात वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर व अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांनी आरोग्य विभाग द्वारे आरोग्य केंद्र सुरु करून नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्याबाबत कार्य केले आहे. राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान कक्ष यांनी याकरिता कामकाज केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.