spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

गडचिरोली जिल्ह्यात नदी संवर्धनासाठी “रिव्हर रँचिंग” उपक्रम

– कुंघाडा (चिचडोह बॅकवॉटर) व कोटगल नदी क्षेत्रांमध्ये एकूण ३ लक्ष (भारतीय प्रमुख कार्प)IMC व माइनर कार्प मत्स्य बोटुकलीचे संचयन

गडचिरोली :- गडचिरोली जिल्ह्यातील जलसंपत्तीचे संवर्धन, स्थानिक मच्छीमारांच्या उपजीविकेचा विकास आणि नदी परिसंस्थेचे संरक्षण या त्रिसूत्री उद्दिष्टांसाठी मत्स्य विभागातर्फे एक महत्त्वपूर्ण रिव्हर रँचिंग (River Ranching) उपक्रम राबविण्यात आला. या अंतर्गत दोन प्रमुख जलक्षेत्रांत एकूण ३ लक्ष भारतीय प्रमुख कार्प (IMC) तसेच माइनर कार्प (puntius spp.) प्रजातींची उच्च प्रतीची मत्स्य बोटुकली सोडण्यात आली.

सदर कार्यक्रमा अंतर्गत दिनांक 27 नोव्हेंबर 2025 रोजी चिचडोह बॅकवॉटरच्या कुंघाडा गावातील परिसरात २.५ लक्ष IMC व माइनर कार्प मत्स्य बोटुकलीचे संचयन करून रिव्हर रँचिंग कार्यक्रम पार पडला. या उपक्रमामुळे जलाशयातील जैवविविधता वाढण्यास मोठी मदत होणार असून स्थानिक मत्स्य सहकारी संस्थांना आगामी काळात अधिक उत्पन्नाचे दरवाजे उघडणार आहेत. तसेच त्यानंतर दिनांक 28 नोव्हेंबर 2025 रोजी कोटगल नदी परिसरात ०.५ लक्ष IMC आणि माइनर कार्प बोटुकली संचयन करण्यात आली. कोटगल नदी हा स्थानिक मच्छीमारांसाठी महत्त्वाचा जलस्रोत असून या उपक्रमामुळे नैसर्गिक प्रजनन वाढून मासळी उत्पादनामध्ये गुणात्मक वाढ अपेक्षित आहे. या दोन्ही कार्यक्रमांना विविध विभागातील वरिष्ठ अधिकारी, स्थानिक संस्था आणि ग्रामपंचायत प्रतिनिधींची उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांमध्ये –राहुल मोरघडे, कार्यकारी अभियंता, सिंचन विभाग, वैभव रविंद्र शेंडे, तलाठी, कुनघाडा, स्थानिक सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी, वाघाडे अध्यक्ष, कुंघाडा मत्स्य सहकारी संस्था, समीर डोंगरे, सहाय्यक आयुक्त, मत्स्य व्यवसाय, गडचिरोली, आमोल सोनोने, सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी, गडचिरोली, विनोद कुनघाडकर, अमित पचारे आदी उपस्थित होते.मान्यवरांनी नदी संवर्धनाच्या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त करताना, या प्रकल्पामुळे स्थानिक मच्छीमारांच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल, नदीतील मासळी प्रजातींचे संतुलन राखता येईल आणि पर्यावरणीय आरोग्य सुधारेल, असे सांगितले.

सदर उपक्रमाचे महत्त्व आणि अपेक्षित लाभ म्हणजेच –

रिव्हर रँचिंगच्या माध्यमातून नैसर्गिक जलस्रोतांमध्ये उच्च गुणवत्तेच्या मत्स्यबोटुकली चे संचयन केल्यामुळे –

स्थानिक जलस्रोतांतील मत्स्य जैवविविधता वाढेल

नदीतील मासळीची संख्या व गुणवत्ता सुधारेल

मत्स्य उत्पादनामध्ये 20–30% पर्यंत वाढ अपेक्षित

मच्छीमारांच्या उत्पन्नात वाढ होऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल

नदी परिसंस्था अधिक संतुलित व सशक्त बनेल

गडचिरोली जिल्ह्यातील मत्स्य व्यवसाय विभागाने राबवलेला हा उपक्रम नदी-संवर्धनातील एक महत्त्वपूर्ण पाऊल मानला जात असून विभाग भविष्यातही अशा उपक्रमांद्वारे जिल्ह्यातील जलसंपत्तीचे संवर्धन करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे श्री समीर डोंगरे सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांनी सांगितले.

Popular Articles