गडचिरोली :- जिल्हयातील सर्व मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना आवाहन करण्यात येते की, आपल्या संस्थेच्या चालू वर्षीच्या (सन 2025-26) ऑडिट रिपोर्टनुसार सभासद संख्या मधून 70 वर्षांपेक्षा जास्त वय असणारे सभासद व मृत सभासद वगळून उर्वरित सर्व सभासदांची सन 2025 – 26 करिता अपघात गट विमा (GAIS) बाबतची 33 मुद्यांची माहिती एक्सेल शीट मध्ये सादर करणेबाबत सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय गडचिरोली कार्यालयाने आपणांस वारंवार अवगत केले आहे.
सदरची 33 मुद्यांची माहिती दिल्यामुळे मत्स्यव्यवसाय विभाग राज्य शासन व केंद्र शासनामार्फत सर्व मच्छीमार बांधवांचा विमा विनाशुल्क काढला जाणार आहे. त्यामुळे आपल्या संस्थेतील मच्छीमार बांधवांचा मासेमारी करताना किंवा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या वारसास शासनाकडून रुपये 5.00 लक्ष मदत मिळणार आहे. तसेच कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास रुपये 2.50 लक्ष मदत मिळणार आहे. त्यामुळे संस्थेचे चेअरमन, सचिव व संचालक यांनी आपापल्या संस्थेतील वरीलप्रमाणे सर्व पात्र सभासद यांची GAIS 33 मुद्द्यांची माहिती एक्सेल शीट मध्ये सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय गडचिरोली कार्यालयास सादर करावी.
तसेच केंद्र शासनाच्या धोरणाप्रमाणे बँकाकडून राज्यातील मच्छिमार, मत्स्यसंवर्धक व मत्स्यकास्तकारांना त्यांचा व्यवसाय सुरळीत चालविण्याकरीता अल्पमुदतीचे खेळते भांडवली कर्ज उपलब्ध होते, यामध्ये व्याजदर 7 टक्के प्रती वर्ष इतका निश्चित करण्यात आाला आहे. सदरचे अल्पमुदतीचे खेळते भांडवली कर्ज संबंधीत मच्छिमार, मत्स्यसंवर्धक व मत्स्यकास्तकारांनी कर्ज उचल केलेल्या तारखेपासून एक वर्षाच्या आत संपूर्ण कर्ज परतफेड केल्यास केंद्र शासनाकडून ३ टक्के दराने व्याज परतावा सवलत देण्यात येते व मच्छिमारांना ४ टक्के दराने परतफेड करावी लागते. परंतु कृषी व पदुम विभाग शासन दिनांक 04/11/2025 अन्वये मच्छिमार, मत्स्यकास्तकार, मत्स्यउत्पादक, मतस्यव्यवस्थापन, मत्स्यबीज संवर्धक, मत्स्यबोटूकली संवर्धन करणारे घटक यामध्ये वर्गीकरण , प्रतवारी, आवेष्ठन, साठवणूक करणारे घटक अशा किसान क्रेडिट कार्डधारक मत्स्यव्यावसायिकांना रु. 2.00 लाखापर्यंतचे अल्पमुदतीचे खेळते भांडवली कर्जावर राज्य शासनाकडून 4 टक्के व्याज परतावा सवलत देण्यात येणार आहे. यापुढे रु.2.00 लाखापर्यंतचे अल्पमुदतीचे खेळते भांडवली कर्जावर केंद्र शासनाकडून 3 टक्के व राज्य शासनाकडून 4 टक्के असे मिळून संपूर्ण 7 टक्के व्याज परतावा सवलत देण्यात येणार आहे.
सदरचे कामामध्ये कार्यतत्परता दाखवून सर्व पात्र सभासद यांची GAIS 33 मुद्यांची माहिती कार्यालयास सादर करावी. तसेच सर्व सभासदाचे किसान क्रेडिट कार्ड काढण्याबाबत कार्यवाही करावी.




