नागपूर १४ : शहरात अमली पदार्थांच्या वाढत्या वापरावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिस प्रशासन सजग झाले असून, गणेशपेठ पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत एक मोठी कारवाई करत एम.डी. पावडर विक्रीसाठी बाळगणाऱ्या एका आरोपीस अटक केली आहे. या आरोपीकडून १६ ग्रॅम एम.डी. पावडरसह मोबाईल व थार गाडी असा एकूण १८ लाख १७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई १३ जुलै २०२५ रोजी पहाटे ३.५३ ते ६.१५ दरम्यान करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून, गणेशपेठ बस स्थानकासमोरील हेडाऊ भोजनालयाजवळ एन.आय.टी कॉम्प्लेक्स रोड येथे सापळा रचण्यात आला होता.
सदर ठिकाणी काळ्या रंगाची महिंद्रा थार (MH-45-AV-4554) गाडी संशयास्पद हालचाली करत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी गाडी थांबवून त्यातील इसमास ताब्यात घेतले आणि त्याचे नाव-पत्ता विचारले असता त्याने संकेत अजय बुग्गेवार (वय २९), रा. प्लॉट नं. १०११, आशीर्वाद नगर, एन.आय.टी मार्केटजवळ, नागपूर असे सांगितले.
१६.०७ ग्रॅम एम.डी. पावडर जप्त
पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या खिशात ०४ झिप लॉक पिशव्यांमध्ये एकूण १६.०७ ग्रॅम एम.डी. पावडर आढळून आली, ज्याची बाजारात किंमत अंदाजे १,६७,७०० रुपये आहे. शिवाय त्याच्याकडून एक मोबाईल फोन व थार गाडीही जप्त करण्यात आली. एकूण मुद्देमालाची किंमत १८,१७,००० रुपये इतकी आहे.
प्रणय बाजारे नावाच्या दुसऱ्या आरोपीचा उलगडा
प्राथमिक चौकशीत बुग्गेवार याने दिलेल्या जबाबात सांगितले की, सदर एम.डी. पावडर त्याला प्रणय बाजारे (वय २५, रा. आशीर्वाद नगर, एन.आय.टी मार्केट जवळ) याने दिली होती. पोलिसांच्या मते, हे दोघे मिळून आर्थिक फायद्यासाठी एम.डी. पावडरची विक्री करीत होते.
या प्रकरणी कलम ८(क), २१(ब), २९ एन.डी.पी.एस. अॅक्टनुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरु आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त राजेंद्र दाभाडे (उत्तर प्रभाग), पोलीस उपायुक्त मा. राहुल मदने (परिक्षेत्र-३), व सहायक पोलीस आयुक्त अनिता मोरे (कोतवाली विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सदर कारवाईत पोलीस निरीक्षक युनुस मुलानी (विशेष शाखा), सपोनि. पांडुरंग जाधव, पोउपनि. डोईफोडे, नुलगुंडावार, तसेच कर्मचारी सागर धवन, वैभव, दलीत, सुमेध, पवन मालखेडे, कमलकिशोर यांनी सक्रिय सहभाग घेतला.





