spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नगरसेवकांनाही विकासाचा हक्काचा निधी द्या – गटनेते काशीनाथ प्रधान यांची आमदार राजीव पोटदार यांच्याकडे मागणी

कामठी :- स्थानिक स्वराज्य संस्थांचा कणा मानल्या जाणाऱ्या नगरसेवकांना आपल्या प्रभागातील विकासकामे प्रभावीपणे राबविता यावीत, यासाठी प्रत्येक नगरसेवकाला दरवर्षी १५ लाख रुपयांचा स्वतंत्र “हक्काचा विकासनिधी” उपलब्ध करून देण्याची ठाम मागणी कामठी नगर परिषदेच्या नगर विकास आघाडीचे गटनेता काशीनाथ प्रधान यांनी विधान परिषदेचे आमदार राजीव पोटदार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

काशीनाथ प्रधान यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, नगरसेवक हे जनतेने थेट निवडून दिलेले लोकप्रतिनिधी असून नागरिकांच्या दैनंदिन समस्या सोडविण्याची सर्वात मोठी जबाबदारी त्यांच्यावर असते. मात्र, खासदार, आमदार आणि जिल्हा परिषद सदस्यांप्रमाणे नगरसेवकांना स्वतंत्र विकासनिधी उपलब्ध नसल्याने अनेक आवश्यक विकासकामे केवळ निधीअभावी रखडत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यातही अडचणी निर्माण होत आहेत.

यामुळे शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजना अथवा जिल्हा नियोजन समिती (DPC) मार्फत प्रत्येक नगरसेवकासाठी दरवर्षी किमान १५ लाख रुपयांचा स्वतंत्र निधी राखीव ठेवण्याचा निर्णय तातडीने घेण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. या निधीच्या माध्यमातून रस्ते, नाल्या, पिण्याचे पाणी, स्वच्छता, सार्वजनिक सुविधा, समाजमंदिरे, उद्याने तसेच इतर मूलभूत नागरी सुविधांची कामे अधिक वेगाने पूर्ण करता येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

काशीनाथ प्रधान यांनी आमदार राजीव पोटदार यांना या मागणीचा शासनदरबारी प्रभावी पाठपुरावा करून नगरसेवकांना न्याय मिळवून देण्याचे आवाहन केले आहे. “जनतेच्या सर्वाधिक संपर्कात असलेल्या नगरसेवकांना विकासनिधीचा अधिकार मिळाल्यास स्थानिक विकासाला नवी दिशा आणि गती मिळेल. नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांचे त्वरित निराकरण होऊन स्थानिक स्वराज्य संस्था अधिक सक्षम होतील,” असेही त्यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे.

राज्यातील नगरसेवकांना स्वतंत्र विकासनिधी देण्याची ही मागणी आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरत असून, शासन याबाबत सकारात्मक निर्णय घेणार का, याकडे राज्यभरातील नगरसेवक आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Popular Articles