spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

सुशिक्षित बेरोजगारांना शेतकऱ्यांचा ई-पीक पेरा ऑनलाईन नोंदणी करण्याची कामे द्या ! 

ई-पीक पेरा ऑनलाईन नोंदणी शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ! 
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन ! 
मोर्शी १० :-  राज्य शासनाच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी पीक पेरा ऑनलाईन नोंदणी करण्यासंदर्भात ई-पीक पेरा पाहणी नवीन ॲप विकसित करून कार्यान्वित केले आहे; परंतु अनेक शेतकऱ्यांना मोबाईल हाताळता येत नाही. ७५ टक्के शेतकऱ्यांजवळ स्वत:चा अँड्राॅईड मोबाईल नाही. काही भागात नेटवर्क, सर्व्हर डाऊनच्या समस्या आ वासून उभ्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना ई-पीक पेरा ऑनलाईन नोंदणी करणे अडचणीचे झाले आहे.
हे टाळण्यासाठी शासनाने तलाठ्यामार्फत गावातील सुशिक्षित बेरोजगारांना मानधनावर स्वतंत्र यंत्रणा निर्माण करून त्यांना ई-पीक पेरा ऑनलाईन नोंदणी करण्याचे काम द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रुपेश वाळके यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना निवेदन देऊन केली आहे.
   ई-पीक पाहणी नोंदणी ही अनेक शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरली आहे, कारण ॲपमध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणी, जसे की ॲप अचानक बंद पडणे, ओटीपी (OTP) न येणे, माहिती भरण्याची प्रक्रिया संथ होणे आणि नोंदणी अर्धवट राहणे, यांमुळे शेतकरी त्रस्त आहेत. या अडचणींमुळे शेतकऱ्यांना पीक विमा, नुकसान भरपाई आणि हमीभाव खरेदीसारख्या सरकारी लाभांपासून वंचित राहावे लागण्याची भीती आहे.
 नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि योग्यप्रकारे मदत करणे शक्य व्हावे, पिकाची माहिती संकलित करताना पारदर्शकता यावी या हेतूने राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी ई-पीक पेरा नोंदणी करण्यासाठी ई-पीक पाहणी ॲप विकसित करून कार्यान्वित केली आहे. खरीप हंगाम २०२५ साठी पीक पाहणीची शेतकरी स्तरावरील नोंदणी १ ऑगस्ट २०२५ ते १४ सप्टेंबर २०२५ चा कालावधी निश्चित केला असून पिक पेरा नोंदणी करण्याचा कालावधी संपत आलेला असून आजही हजारो शेतकऱ्यांचा पीक पेरा भरायचा शिल्लक असल्यामुळे पडीक क्षेत्राची माहिती, बांधावरील झाडांची माहिती कशी भरावी असा प्रश्न निर्माण झाला आहे. सुशिक्षित अनुभवीसाठी ही पद्धत सोयीची असली तरी ७५ टक्के शेतकऱ्यांसाठी ई-पीक पाहणी या ॲपच्या माध्यमातून ई-पीक पेरा नोंदणी करणे पूर्णत: अडचणीचे आहे. त्यासाठी शासनाने गावातील तलाठ्यामार्फत सुशिक्षित बेरोजगारांना संधी देऊन एक स्वतंत्र यंत्रणा पथक तयार करून त्यांना शेतकऱ्यांच्या ई-पीक पेरा ऑनलाईन नोंदणी करण्याची कामे द्यावी तसेच सर्व्हर डाउन होणे, शेतकऱ्यांमध्ये अपुरी जागृती आणि तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांची पीक पेरा नोंदणी झालेली नसुन पिक पेरा नोंदणी साठी मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष रुपेश वाळके यांच्या तर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांसमोर या येत आहेत अडचणी ! 
ऑनलाईन नोंदणी न केल्यास ७/१२ मधील पीक पेरा कोरा राहील. त्यामुळे कोणतीही शासकीय मदत मिळणार नाही असे नमूद करण्यात आले आहे; परंतु अजूनही ७५ टक्के शेतकऱ्यांजवळ अँड्राॅईड स्मार्टफोन उपलब्ध नाहीत. काही शेतकऱ्यांजवळ मोबाईल आहे, तर पीक पेरा नोंदणी करण्याची प्रक्रिया माहीत नाही. या परिसरातील काही भागात नेटवर्क मिळत नाही. अशा अनेक अडचणींना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे.

Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.