spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कृषी अवजारे बँक योजनेला उत्तम प्रतिसाद

– शेती अवजारांसाठी मिळणार अनुदान

– गावातच मिळणार शेती अवजारे

नागपूर :- नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा- २ अंतर्गत असलेल्या गाव स्तरावरील अवजारे बँक योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, नागपूर जिल्ह्यात तब्बल २३५ अर्ज या योजनेत आले आहेत. लवकरच लॉटरी पद्धतीने यासाठी महिला बचत गटांची निवड करण्यात येणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना शेतीविषयक कामांसाठी त्यांच्या गावातच संबंधित अवजारे उपलब्ध होणार आहेत.

शेती तोट्याची ठरू नये, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्यापैकीच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा २ जागतिक बँकेच्या सहकार्याने राबविण्यात येत असून, त्यातच अवजारे बँकेचा समावेश आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी महागडी यंत्रे आणि अवजारे भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देणारी ही सुविधा आहे. यामुळे लहान शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, नांगर, पेरणी यंत्रे इत्यादी साधने स्वस्त दरात मिळतात आणि शेतीची कामे वेळेत पूर्ण होतात.

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत ही योजना राबवली जाते. प्रत्येक शेतकऱ्याला ट्रॅक्टर किंवा मोठी अवजारे विकत घेणे परवडत नाही. अवजारे बँकेमुळे अवजारे भाड्याने मिळून खर्चात बचत होते. तसेच मजूर मिळणे कठीण होते, त्यावेळी यांत्रिकीकरणामुळे कामे जलद होतात.

एक गाव एक कृषी अवजारे बँक या तत्त्वानुसार या योजनेत गावातील उमेद व माविम पुरस्कृत महिला बचत गट तसेच महिला गाव संघ यांच्याकडून अर्ज मागविण्यात आले होते. त्यात नागपूर जिल्ह्यातील १३ तालुके मिळून तब्बल २३५ अर्ज कृषी विभागाकडे आले आहेत. त्यांच्या छाननीचे काम सध्या सुरू असून, त्यानंतर पात्र अर्जांमधून लॉटरी पद्धतीने या योजजनेसाठी महिला बचत गटांची निवड केली जाणार आहे. संबंधित बचत गटाला अवजारांच्या खरेदासीठी ६० टक्के (किंवा जास्तीत जास्त २४ लाख रुपये) अनुदान देण्यात येणार आहे. भात पीक प्रमुख नसलेल्या गावांना बेडमेकर, बियाणे टोकन यंत्रणे, त्याचप्रमाणे प्रमुख पीक भात असलेल्या गावांना भात पेरणी यंत्र, भात कापणी यंत्र ही अवजारे घेणे बंधनकारक आहेत.

संबंधित क्षेत्रातील पीक रचना लक्षात घेऊन तयार करण्यात आलेल्या यादीतून अवजारे घेण्याची मुभा संबंधित बचत गटाला राहील. या यादीत बीबीएफ यंत्र, भात लावणी- रोवणी यंत्र, कापणी यंत्र, मळणी यंत्र, कंबाइन हार्वेस्टर, बॅटरी- पेट्रोल ट्रॅक्टर चलित फवारणी पंप, फळबागेत लागवडीसाठी खड्डे खोदणारे यंत्र, झाडांचा आकार व्यवस्थापन यंत्र, फळे तोडणी यंत्र, मल्चिंग अंथरणारे यंत्र, कांदा लावणी तसेच कांद काढणी यंत्र, सिचंनासाठी तुषार यंत्र, निंबोळी बियांची पावडर करण्यासाठी पल्वरायजर, स्वयंचलित पेरणी- आंतर मशागत- फवारणी यंत्र या अवजारांचा समावेश आहे. या योजनेअंतर्गत स्थानिक प्रचलित भाडेदरापेक्षा किमान २०% कमी दराने साधने भाड्याने देणे बंधनकारक आहे.

शेतकऱ्यांना शेती करताना येणाऱ्या अडचणी कमी व्हाव्या, शेतीची कामे वेळेत व्हावी व उत्पादकता वाढावी यासाठी अवजारे बँक ही अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेची प्रक्रिया सुरू आहे व त्याचा शेतकऱ्यांना निश्चित लाभ होईल, असा विश्वास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नागपूर यांनी कळविले आहे.

Popular Articles