भंडारा :- जिल्ह्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक सुलभ, पारदर्शक व जलद मिळाव्यात या उद्देशाने भंडारा जिल्हा प्रशासनाच्या “भंडारा सेवासंवाद” या अधिकृत व्हॉट्सॲप चॅटबॉटचा शुभारंभ पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते करण्यात आला.
हा 800 750 1269 हा क्रमांक भंडारा जिल्हा प्रशासनाचा अधिकृत व्हॉट्सॲप क्रमांक तसेच चॅटबॉट असून, नागरिक थेट आपल्या मोबाईलवरून विविध शासकीय सेवा व माहिती मिळवू शकणार आहेत.
“भंडारा सेवासंवाद” चॅटबॉटच्या माध्यमातून नागरिकांना खालील सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत –
• नागरिकांच्या तक्रारी नोंदविण्याची सुविध
• जवळच्या आपले सरकार सेवा केंद्राची माहिती
• विविध आरटीएस (RTS) सेवांबाबत सविस्तर माहिती
• शेतकऱ्यांसाठी पांधन रस्त्यांसाठी विनंती नोंदविण्याची सुविधा
• विविध महत्त्वाच्या शासकीय योजना व उपक्रमांची माहिती
या उपक्रमामुळे जिल्ह्यातील नागरिकांना शासकीय कार्यालयांमध्ये वारंवार फेऱ्या मारण्याची गरज कमी होणार असून, डिजिटल माध्यमातून थेट प्रशासनाशी संवाद साधणे शक्य होणार आहे. हा चॅटबॉट “डिजिटल इंडिया” व “सेवा आपल्या दारी” या संकल्पनेला बळ देणारा महत्त्वाचा उपक्रम आहे.
पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी या उपक्रमाचे कौतुक करत, “भंडारा सेवासंवाद” चॅटबॉटमुळे नागरिक व प्रशासन यांच्यातील संवाद अधिक प्रभावी होईल, असा विश्वास व्यक्त केला.
भंडारा जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी 800 750 1269 या अधिकृत व्हॉट्सॲप क्रमांकावर संपर्क साधून “भंडारा सेवासंवाद” चॅटबॉटचा जास्तीत जास्त वापर करून उपलब्ध सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.








