spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अग्निवीर भरतीसाठी जिल्ह्यात सहा ठिकाणी मार्गदर्शन मेळावे

– १० ते १२ ऑगस्ट दरम्यान आयोजन; इच्छुक युवक-युवतींना सहभागी होण्याचे आवाहन

गडचिरोली :- भारतीय सैन्यातील अग्निवीर भरती प्रक्रियेबाबत जिल्ह्यातील इच्छुक युवक-युवतींना सविस्तर माहिती व मार्गदर्शन मिळावे, यासाठी गडचिरोली जिल्ह्यात १० ते १२ ऑगस्ट २०२६ या कालावधीत सहा ठिकाणी अग्निवीर भरती मार्गदर्शन मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली, सेना भरती कार्यालय, नागपूर आणि लाईड्स मेटल कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने हे मेळावे आयोजित करण्यात येत आहेत.

अग्निपथ योजनेअंतर्गत भारतीय सैन्यात अग्निवीर म्हणून सेवा करण्याची संधी उपलब्ध आहे. जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांना या भरती प्रक्रियेची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी, पात्रता व निवड प्रक्रियेबाबत त्यांच्या शंकांचे निरसन व्हावे आणि भरतीसाठी आवश्यक मार्गदर्शन मिळावे, हा या मेळाव्यांच्या आयोजनामागील प्रमुख उद्देश आहे.

मेळाव्यांचे वेळापत्रक

१० ऑगस्ट २०२६ : सकाळी १० वाजता शिवाजी कॉलेज, धानोरा रोड, गडचिरोली येथे, तर दुपारी ३ वाजता श्री. गोविंदराव मुनघाटे कॉलेज, कुरखेडा येथे मेळावा होणार आहे.

११ ऑगस्ट २०२६ : सकाळी १० वाजता राज विद्या निकेतन, हेडरी येथे, तर दुपारी ३ वाजता जय परसापाने सायन्स कॉलेज, भामरागड येथे मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

१२ ऑगस्ट २०२६ : सकाळी १० वाजता राजे धर्मराव आर्ट्स कॉलेज, आलापल्ली येथे, तर दुपारी ३ वाजता महात्मा फुले कॉलेज, आष्टी येथे मार्गदर्शन मेळावा होणार आहे.

या मेळाव्यांमध्ये सेना भरती कार्यालय, नागपूर येथील अधिकाऱ्यांमार्फत अग्निवीर भरती प्रक्रिया, पात्रता निकष, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, सेवाकाल, वेतन, सेवा निधी, सेवेनंतर उपलब्ध होणाऱ्या विविध संधी तसेच इतर सुविधांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यावेळी उमेदवारांना भरती प्रक्रियेसंदर्भातील विविध बाबी समजून घेण्याची तसेच त्यांच्या शंकांचे निरसन करून घेण्याची संधी मिळणार आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील अग्निवीर भरतीसाठी पात्र व इच्छुक युवक-युवतींनी १० ते १२ ऑगस्टदरम्यान निर्धारित वेळेनुसार संबंधित ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मार्गदर्शन संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्तांनी केले आहे.

Popular Articles