spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

सरकार भिकारी झाले आहे का? नाना पटोलेंचा जळजळीत सवाल; खत-बियाण्यांच्या काळ्याबाजारावरून प्रशासनाला धारेवर धरले

हंसराज, भंडारा :- जिल्ह्यात खते आणि बियाण्यांचा मोठ्या प्रमाणावर काळाबाजार सुरू असून, शेतकऱ्यांची लूट होत आहे. उन्हाळी धानाचे आणि इतर पिकांचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत. “सरकार भिकारी झाले आहे का?” असा संतप्त सवाल करत, येत्या ८ दिवसांत शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाहीत तर तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेस नेता नाना पटोले यांनी दिला आहे. ते भंडाऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

युरियाचा काळाबाजार आणि प्रशासनाचे दुर्लक्ष नाना पटोले यांनी खतांच्या तुटवड्यावर भाष्य करताना सांगितले की, सध्या भंडारा जिल्ह्यात १० हजार मॅट्रिक टन युरिया उपलब्ध आहे. असे असतानाही २६६ रुपयांचे युरियाचे पोते शेतकऱ्यांना कृषी केंद्रांवर ५०० रुपयांना विकले जात आहे. रेती तस्करांवर कारवाई करण्यासाठी पोलीस आणि महसूल विभाग ज्या तत्परतेने काम करतो, तशीच तत्परता कृषी, पोलीस आणि महसूल विभागाने संयुक्तपणे दाखवून या काळ्याबाजाराला लगाम घालावा आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

२१ खतांचे नमुने नापास; बोगस बियाण्यांचा सुळसुळाट जिल्ह्यात बोगस आणि भेसळयुक्त खतांचा सुळसुळाट झाला असल्याचा आरोप पटोले यांनी केला. कृषी विभागाने घेतलेल्या नमुन्यांपैकी २१ खतांचे सॅम्पल फेल झाले आहेत. बियाण्यांची हीच परिस्थिती असून खते आणि बियाण्यांच्या नावाखाली शेतकऱ्यांना केवळ ‘माती’ विकली जात आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहून ही लूट थांबवावी, असेही ते म्हणाले.

शेतकऱ्यांचे पैसे थकले; सरकारवर सडकून टीका उन्हाळी धानाचा हंगाम संपून आता खरीप हंगाम जोमात आहे, मात्र शेतकऱ्यांच्या हातात अद्याप धानाचे पैसे आलेले नाहीत. सोयाबीन आणि मक्याचेही चुकारे थकले आहेत. यावरून सरकारवर टीका करताना पटोले म्हणाले की, “शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे द्यायला सरकारकडे निधी नाही का? सरकार भिकारी झाले आहे का? ही शेतकऱ्यांची थट्टा असून सरकारने तातडीने थकीत रक्कम जमा करावी.”

८ दिवसांचा अल्टिमेटम शेतकऱ्यांचे थकीत पैसे, बोगस बियाणे आणि खतांचा काळाबाजार या विषयावर प्रशासनाने ८ दिवसांच्या आत ठोस पावले उचलली नाहीत, तर संपूर्ण जिल्ह्यात काँग्रेसतर्फे मोठे जनआंदोलन उभे केले जाईल, असा इशारा नाना पटोले यांनी यावेळी दिला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.