भंडाऱ्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत पूरसदृश स्थिती; घरं आणि शाळांमध्ये शिरलं पाणी

0
57

भंडारा, 16 सप्टेंबर :– राज्यात सर्वदूर पावसाने हाहाकार माजवला असून काही ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. याचाच फटका सोमवारी भंडारा शहराला बसला. पहाटेपासून तब्बल दोन तास मुसळधार पाऊस झाल्याने शहरातील अनेक भाग जलमय झाले.

शास्त्री चौक परिसरासह नूतन विद्यालय, महिला समाज शाळा याठिकाणी पावसाचे पाणी शिरल्याने शाळांना अक्षरशः तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून नागरिकांना घरातील पाणी बाहेर काढण्यासाठी अक्षरशः संघर्ष करावा लागत आहे.

शहरात भूमिगत पाइपलाइन आणि गटाराच्या जलवाहिन्यांची कामे सुरू असल्याने मोठ्या नाल्यांची कामे थांबलेली आहेत. परिणामी नाल्यांचा प्रवाह अडवला जात आहे. त्यामुळे साचलेले पाणी रस्त्यावरून थेट घरात शिरत असून नागरिक त्रस्त झाले आहेत. नागरिकांच्या मते, अपुऱ्या नियोजनामुळेच ही बिकट परिस्थिती उद्भवली आहे.

राजगोपालाचारी वार्डातील पोलीस विभागात कार्यरत नीलेश खडसे यांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांच्या घराला ‘स्विमिंग टँक’चे स्वरूप आले. घरातील साहित्य पाण्यावर तरंगायला लागले असून मोठी नासाडी झाली आहे. खडसे यांनी स्वतः घरातील विदारक दृश्याचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर प्रसारित केला आहे.

नागरिकांनी तातडीने नाल्यांची साफसफाई करून नियोजनबद्ध व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. अन्यथा मुसळधार पावसाच्या वेळी अशीच परिस्थिती वारंवार निर्माण होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.