spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव; १५० हून अधिक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप

– मराठा विद्या प्रसारक समाजातर्फे गुणवंत विद्यार्थी सत्कार व शिष्यवृत्ती वितरण समारंभ उत्साहात

नागपूर :- मराठा विद्या प्रसारक समाज, नागपूर च्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही मराठा समाजातील गुणवंत, होतकरू व गरजू विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच शिष्यवृत्ती वितरण समारंभ रविवारी (९ ऑगस्ट) छत्रपती शिवाजी महाराज स्मृती सभागृह, सक्करदरा चौकात उत्साहात पार पडला. संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत डॉ. राजे मुधोजी भोसले यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या कार्यक्रमाला नागपूर शहराच्या महापौर निता ठाकरे तसेच रश्मीता राव (IPS), पोलीस उपआयुक्त, परिमंडळ क्र. ४, नागपूर शहर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. यावेळी समाजातील १५० हून अधिक होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना एकूण १ लाख ७५ हजार रुपयांची शिष्यवृत्ती वितरित करण्यात आली. शैक्षणिक क्षेत्राबरोबरच क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक तसेच विविध विशेष क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी प्रा. शिशिर अशोकराव बागल, प्रशांत दौलतराव शिर्के, चेतन अरविंद मामुलकर आणि आश्लेषा पुरुषोत्तम कावळे यांनी आचार्य (Ph.D.) पदवी प्राप्त केल्याबद्दल त्यांचा सन्मानपत्र देऊन विशेष गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या प्रतिमांना मान्यवरांसह ज्येष्ठ आजीव सभासद शंकरराव जाधव व हंबीरराव मोहिते यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविक संस्थेचे मुख्य सचिव डॉ. प्रकाश मोहिते यांनी केले. प्रारंभीचे संचालन समितीचे सहसंयोजक गजाननराव कावळे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन नरेंद्र मोहिते यांनी केले, तर आभार समितीचे मुख्य संयोजक सुशांत शिंदे यांनी मानले. कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी प्रवीण शिर्के, राजेश काटे, दिलीप सस्ते, निलेश चव्हाण, प्रशांत (बालू) भोसले, अनुप जाधव, सतीश मोहिते, अनिता जाधव, महेंद्र शिंदे, अविनाश घोगले, हरीश इंगळे, अमर पिसाळ व महेश पवार यांच्यासह समाजातील मान्यवर उपस्थित होते. गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देतानाच गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून शिक्षणासाठी आर्थिक पाठबळ देण्याचा उपक्रम समाजाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे यावेळी अधोरेखित झाले. समारंभाला समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.