पांढरकवडा :- या ग्रीन सिटीला ‘एव्हरग्रीन’ करायचे तर शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.अभिनय नहाते आणि त्यांच्या सर्व २२ सहकाऱ्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विराट जनसभेसमोर मनोगत मांडताना केले.
हिरवाईने नटलेल्या पांढरकवड्यात कष्टाळू लोक राहतात. या भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शिवसेना निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. या नगर परिषदेला माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात मी निधी दिला आहे. पाणीपुरवठा योजनेसाठी ६५ कोटी रुपये दिले होते. आता शहरात रस्ते, पाणी, गटारे, मैदाने, क्रीडांगणे उभी करू, कारण नगरविकास विभागाच्या माध्यमातून निधी देणे मला शक्य आहे.
माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात आम्ही अनेक योजना केल्या. त्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सर्वात आवडती योजना आहे. कारण या योजनेच्या माध्यमातून महिला भगिनींना सक्षम करता आले. आताही या लाडक्या बहिणींना अधिक सक्षम करण्यासाठी राज्य शासनाकडून अनेक प्रयत्न सुरू आहेत. कोणी कितीही अफवा पसरवल्या तरी लाडकी बहिण योजना बंद होणार नाही असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यासह शेतकरी सन्मान योजना, वयश्री योजना अशा अनेक योजना केल्या. सरकारच्या तिजोरीवर पहिला हक्क बळीराजाचा आहे. त्यामुळे कापसाच्या ग्रेडचा प्रश्न नक्की कॅबिनेट बैठकीत मांडू अशी घोषणा याप्रसंगी केली. कापसाची खरेदी १३ क्विंटल ऐवजी ३० क्विंटल करावी या मागणीचा नक्की पाठपुरावा करू असे शिंदे यांनी जाहीर केले. पांढरकवडा येथील रोजगाराचा प्रश्न सोडवण्यासाठी इथे एमआयडीसी आणण्याबाबत उद्योग मंत्री उदय सामंत यांना थेट फोन करून निर्देश दिले. आचारसंहिता संपल्यावर त्वरित त्याची कारवाई होईल असे याप्रसंगी स्पष्ट केले.
खेतानी फाउंडेशनने केलेल्या कोरोना काळातील कामांचा लेखाजोखा मांडताना इन्सानियत जिंदा है तो “सलीम भैय्या” जैसे लोगो के वास्ते जिंदा है असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.
यावेळी मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.अभिनय नहाते, खेतानी फाउंडेशनचे सर्वेसर्वा सामाजिक कार्यकर्ते सलिम खेतानी, सर्व उमेदवार, शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








