– महाप्रसाद आणि भजन संध्येसह विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल
कामठी :- रनाळा येथील प्रोफेसर कॉलनी परिसरात नव्याने बांधण्यात आलेल्या भव्य श्री गणेश मंदिरात विविध देवदेवतांच्या मूर्तींचा प्राणप्रतिष्ठा सोहळा येत्या २४ ते २६ जानेवारी २०२६ दरम्यान अत्यंत उत्साहात साजरा होणार आहे. या सोहळ्यानिमित्त धार्मिक विधी, महाप्रसाद आणि भजन संध्येचे आयोजन करण्यात आले असून, परिसरातील भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
या नवनिर्मित मंदिरात भगवान श्री गणेश यांच्यासह दुर्गादेवी, दत्तात्रय भगवान, श्री राधा-कृष्ण, साईबाबा, स्वामी समर्थ, गजानन महाराज, शिवलिंग, रामदरबार आणि हनुमानजी अशा विविध मूर्तींची स्थापना केली जाणार आहे.
२४ जानेवारी (शनिवार) रोजी सकाळी ९ वाजता संकल्प पुण्य-वाचन व देवता स्थापनेने सोहळ्याची सुरुवात होईल. सकाळी १० वाजता भव्य कलश यात्रा काढण्यात येईल.
२५ जानेवारी (रविवार) रोजी सकाळी ९ वाजता देवता स्नान विधी आणि देवता शयन विधी पार पडेल.
२६ जानेवारी (सोमवार) रोजी सकाळी ९ वाजता पर्याय होम विधी आणि मूर्तींची विधीवत स्थापना केली जाईल. दुपारी ४ वाजता सुंदरकांड पठण होईल. सायंकाळी ७ वाजेपासून भव्य महाप्रसाद आणि भजन संध्येचे आयोजन करण्यात आले आहे.
या मंगलमयी सोहळ्याला राज्याचे महसूल व नागपूर-अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी श्री गणेश मंदिर सेवा समिती, प्रोफेसर कॉलनी, रनाळा येथील सर्व पदाधिकारी व सदस्य परिश्रम घेत आहेत. या आध्यात्मिक सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन श्री गणेश मंदिर सेवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.




