spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मनपाची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी कर वसुली वाढवा – सभापती सरीता कावरे यांचे प्रशासनाला आवाहन

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाने थकबाकीदारांकडून मालमत्ता कराची जास्तीत जास्त वसुली करावी, असे निर्देश कर आकारणी व कर संकलन विशेष समितीच्या सभापती सरिता ईश्वर कावरे यांनी मंगळवारी (ता.17) बैठकीत दिले.

कर आकारणी व कर संकलन विशेष समितीची आढावा बैठक मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात सभापती सरिता कावरे व उपसभापती सुनील हिरणवार यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी समितीचे सदस्य रमेश भंडारी, सरस्वती सलामे, मनोज कुमार गावंडे, रेखा पाटील, उपायुक्त  मिलिंद मेश्राम, उपायुक्त तथा सहायक आयुक्त गणेश राठोड, अशोक गराटे, सहायक आयुक्त धनंजय जाधव,  विजय थूल, नरेंद्र बावनकर, राजकुमार मेश्राम, प्रमोद वानखेडे, विकास रयबोले, हरीश राऊत आणि मुख्यालयातील कर अधीक्षक जितेंद्रसिंग तोमर यांच्यासह मनपाचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

बैठकीत कर विभागाचे उपायुक्त मिलिंद मेश्राम यांनी मालमत्ता धारकांवरील कर आकारणी, नामबदल (म्युटेशन), कर वसुली, पोस्टल ॲड्रेस, वॉरंट, हुकूमनामा, जप्ती, जाहीरनामा, इतर शहरांशी नागपूरच्या मालमत्ता कराची तुलना, विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या, झोननुसार कर वसुली, ऑनलाईन व ऑफलाईन कर भरणा, अभय योजना आणि शासकीय मालमत्तांवरील कर यांबाबत सादरीकरण केले. तसेच आर्थिक वर्ष 2025-26 साठी असलेल्या 325 कोटींच्या वसुली उद्दिष्टापैकी आतापर्यंत 213 कोटी रुपयांची वसुली झाल्याची माहिती दिली.

यावेळी सभापती सरिता कावरे यांनी सांगितले की, नागपूर शहराचा विकास होत असताना महानगरपालिकेची आर्थिक स्थिती अधिक मजबूत करण्यासाठी कर विभागाने जास्तीत जास्त वसुली करावी. 31 मार्चपर्यंत दिलेले उद्दिष्ट 100 टक्के पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. तसेच कर विभागात मनुष्यबळ वाढवण्यासाठी महापौरांकडे नोकरभरतीचा प्रस्ताव पाठवण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले. उपसभापती सुनील हिरणवार यांनी ज्या भागात कर वसुली कमी आहे, तिथे स्थानिक नगरसेवकांची मदत घेऊन वसुली वाढवण्याच्या सूचना सहायक आयुक्तांना केल्या.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.