spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

“कॅरी ऑन” संधी नाकारून विद्यार्थ्यांवर अन्याय; गांधीगिरी पद्धतीने गुलाबपुष्प देत नागपूर विद्यापीठ प्रशासनाला जागवण्याचा राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचा प्रयत्न

नागपूर २९ : “कॅरी ऑन” संधी नाकारून विद्यार्थ्यांवर अन्याय; गांधीगिरी पद्धतीने गुलाबपुष्प देत नागपूर विद्यापीठ प्रशासनाला जागवण्याचा राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचा प्रयत्न.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनाने ‘कॅरी ऑन’ संधी नाकारल्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याच्या उंबरठ्यावर आले आहे. यासंदर्भात मागील काही महिन्यांपासून वारंवार निवेदन आणि मागण्या करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केले. अखेर, राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाने आज गांधीगिरी पद्धतीने प्र-कुलगुरून डॉ.सुभाष कोंडावर यांना गुलाबपुष्प देत शांततेच्या मार्गाने निषेध व्यक्त केला आणि “कॅरी ऑन” योजना तात्काळ लागू करण्याची ठाम मागणी केली.

विद्यार्थी महासंघाने स्पष्ट केले की आर्थिक अडचणी, कौटुंबिक जबाबदाऱ्या, आरोग्यविषयक अडचणी व इतर अनिवार्य कारणांमुळे अनेक विद्यार्थ्यांना वेळेवर परीक्षा देता आली नाही. परिणामी, A.T.K.T. (Allowed To Keep Terms) चे निकष पूर्ण न झाल्यामुळे पुढील वर्षात प्रवेश नाकारला जात आहे. अशा परिस्थितीत ‘कॅरी ऑन’ हीच एकमेव पर्यायी संधी असून ती न दिल्यास विद्यार्थ्यांचे संपूर्ण वर्ष वाया जाईल.

विदर्भातील इतर विद्यापीठांमध्ये यशस्वीपणे राबवली गेलेली ‘कॅरी ऑन’ योजना नागपूर विद्यापीठातही तात्काळ लागू करावी, अशी ठाम मागणी महासंघाने केली. विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात न जाऊ देता त्यांना संधी व मार्गदर्शन मिळावे, यासाठी A.T.K.T. निकषांमध्ये शिथिलता देऊन पुढील वर्गात प्रवेशाची मुभा द्यावी, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले.

यावेळी राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे नागपूर शहर जिल्हाध्यक्ष निलेशजी कोढे, विद्यार्थी अध्यक्ष रितेश कडव, उपाध्यक्ष यश हजारे, दिलीप उज्जैनकर, अमेय रोकडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. गुलाबपुष्प देत गांधीगिरी पद्धतीने शांततेत निषेध नोंदवत त्यांनी प्र-कुलगुरूंना निवेदन सादर केले.

महासंघाने प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला की, जर “कॅरी ऑन” योजनेवर तातडीने निर्णय घेण्यात आला नाही, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल. याची दखल घेत प्र-कुलगुरूंनी येत्या २ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता ‘मॅनेजमेंट कौन्सिल’ची विशेष बैठक बोलावल्याचे जाहीर करत, यावर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.

या शांततामय आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांच्या इतर महत्त्वाच्या अडचणींसंदर्भातही विद्यापीठ प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. यामध्ये, कॉमर्स विभागातील पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पीएच.डी. कोर्सवर्क विद्यापीठाच्या माध्यमातून मराठी भाषेत आणि ऑफलाइन स्वरूपात घेण्यात यावे, अशी मागणी केली. बहुतांश विद्यार्थी ग्रामीण भागातून येत असल्याने इंग्रजी माध्यमातील अध्यापन त्यांच्यासाठी अडथळा ठरत आहे. त्याचबरोबर, अनेक विद्यार्थ्यांचे निकाल ‘withheld’ स्थितीत राहत असल्यामुळे त्यांना वेळेवर अधिकृत मार्कशीट मिळत नाही, परिणामी पुढील अभ्यासक्रमात प्रवेश घेणे कठीण होते. यासाठी निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर ३० दिवसांच्या आत अंतिम निकाल घोषित करून अधिकृत मार्कशीट त्वरित उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच, रिचेकिंगसाठी सादर केलेल्या उत्तरपत्रिकांचे निकाल लांबणीवर पडत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे रिचेकिंगचा निकालही निश्चित कालमर्यादेत जाहीर करण्यात यावा, जेणेकरून विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक नियोजन सुरळीतपणे करता येईल, अशीही विनंती महासंघातर्फे करण्यात आली.

राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाने स्पष्ट केले की, शिक्षणात समान संधी, संवेदनशील धोरण आणि सहानुभूतीपूर्ण निर्णय हेच आधुनिक शिक्षण व्यवस्थेचे आधारस्तंभ आहेत. विद्यार्थ्यांना ‘कॅरी ऑन’ची संधी देऊन त्यांच्या भविष्यातील अडथळे दूर करणे, ही विद्यापीठ प्रशासनाची नैतिक जबाबदारी आहे


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.