spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

सुख शांती समाधान संस्थेतर्फे ६० ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

नागपूर :- सुख शांती समाधान संस्था, नागपूर च्यावतीने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शहर व परिसरातील संस्थेच्या नियमित सुरू असलेल्या ६० योग केंद्रांवर उत्साहात योग दिन साजरा करण्यात आला. प्रत्येक केंद्रावर संस्थेच्या कार्यकर्त्यांची नियुक्ती करून योगाचे महत्त्व, आरोग्यदायी जीवनातील त्याची भूमिका आणि नियमित योगाभ्यासाचे फायदे याबाबत मार्गदर्शन केले. यावर्षी संस्थेची “वसुधैव कुटुंबकम” ही संकल्पना आणि आंतरराष्ट्रीय योग दिनाची “समृद्ध वृद्धत्व” ही थीम यांचा समन्वय साधत सहभागी नागरिकांना योगाचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमात विविध योगासने, प्राणायाम तसेच ओंकार साधना करण्यात आली. अध्यक्ष सचिन माथूरकर यांचे मार्गदर्शनपर ध्वनिमुद्रित संदेश सर्व केंद्रांवर उपस्थितांना ऐकविण्यात आले. याशिवाय डब्ल्यूसीएल उमरेड, एम.बी.टाऊन, नर्सिंग कॉलेज, वाठोडा गर्ल्स हॉस्टेल, छावणी, कोराडी क्रीडा संकुल, भिलगाव ग्रामपंचायत, भागुबाई समाज, कामठी, डब्ल्यूसीएल नागपूर तसेच आशा संस्थेसह विविध ठिकाणी योग दिनाचे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सर्वच ठिकाणी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विशेषतः डब्ल्यूसीएल नागपूर येथे तब्बल १,२०० योगप्रेमींनी सामूहिक योगासने, प्राणायाम व ओंकार साधना करून नियमित योग करण्याचा संकल्प केला. संस्थेची रायपूर शाखेनेही विविध ठिकाणी योग दिनाचे कार्यक्रम यशस्वीपणे आयोजित केले. सुख शांती समाधान संस्था गेल्या २२ वर्षांपासून निःशुल्क व निःस्वार्थ सेवाभावाने योग प्रसाराचे कार्य करीत असून संस्थापक अध्यक्ष व योगगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यसंघ सातत्याने समाजहिताचे उपक्रम राबवत आहे. या संपूर्ण उपक्रमाचे नियोजन प्रोजेक्ट डायरेक्टर सुनीलजी पोतदार यांनी प्रभावीपणे केले. असे सचिव शीला केळापूरे यांनी सांगितले.

Popular Articles