कामठी :- सेबी आणि स्केलिंग हाई वेंचर्स प्रा.लि. यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समिती, कामठी येथे अंगणवाडी सेविकांसाठी गुंतवणूकदार जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचा मुख्य उद्देश अंगणवाडी सेविकांमध्ये आर्थिक साक्षरता वाढविणे तसेच बचत व गुंतवणुकीबाबत योग्य माहिती आणि जागरूकता निर्माण करणे हा होता.कार्यक्रमादरम्यान उपस्थित अंगणवाडी सेविकांना गुंतवणुकीचे महत्त्व, आर्थिक नियोजन, विविध गुंतवणूक पर्याय, जोखीम व परतावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच गुंतवणूक करताना योग्य माहिती घेणे, अधिकृत माध्यमांचा वापर करणे, फसव्या गुंतवणूक योजनांपासून सावध राहणे आणि आर्थिक निर्णय घेताना आवश्यक ती खबरदारी घेणे याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाला अंगणवाडी सेविकांचा उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिसाद मिळाला. उपस्थित सेविकांनी कार्यक्रमामध्ये सक्रिय सहभाग घेत विविध प्रश्न विचारून गुंतवणूक व आर्थिक नियोजनासंदर्भात माहिती जाणून घेतली. या उपक्रमामुळे अंगणवाडी सेविकांमध्ये आर्थिक बाबींविषयी जागरूकता निर्माण होण्यास तसेच भविष्यासाठी योग्य आर्थिक नियोजन करण्यास निश्चितच मदत होणार आहे. अशा प्रकारच्या गुंतवणूकदार जनजागृती कार्यक्रमांमुळे समाजातील विविध घटकांमध्ये आर्थिक साक्षरता वाढण्यास आणि सुरक्षित व सुजाण गुंतवणुकीची सवय निर्माण होण्यास हातभार लागतो.





