– आरोग्य तपासणी शिबिराला पावसातही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नागपुर :- ‘माझे गाव, आरोग्यसंपन्न गाव’ या अभियानांतर्गत कवठा येथील ग्रामपंचायत (अंगणवाडी) परिसरात २९ ऑगस्ट रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. शालिनीताई मेघे वैद्यकीय महाविद्यालय, हिंगणा, नागपूर आणि गट ग्रामपंचायत कवठा (म्हसाळा) यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर घेण्यात आले. सतत पाऊस सुरू असतानाही गावातील नागरिकांनी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती नोंदवली.
शिबिरात नागरिकांची विविध आजारांसाठी आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर आवश्यकतेनुसार औषधोपचार देण्यात आले. तसेच शस्त्रक्रिया अथवा पुढील वैद्यकीय उपचारांची गरज असलेल्या लाभार्थ्यांना पुढील उपचारासाठी संबंधित ठिकाणी संदर्भित करण्यात आले.
शिबिरात शालिनीताई मेघे वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. जोशी, डॉ. अतिका, डॉ. खुशिया, डॉ. अभिनव आणि डॉ. हिमांशू, फार्मासिस्ट पायल तसेच निलेश डहाके यांनी सेवा दिली. आरोग्य उपकेंद्र खसाळा येथील डॉ. सायमा नाज, एएनएम आडे, एमपीडब्ल्यू नंदगीरवार आणि आशा कार्यकर्त्या रुपाली राऊत, ममता रहांगडाले, रजनी खेडेकर, ज्योत्स्ना सोनारे, शारदा सोनटक्के, शीतल मोहोड, ज्योत्स्ना भोयर, किरण ईरखेडे आणि कल्याणी कुहीटे तसेच मदतनीस यांनी शिबिरासाठी सहकार्य केले.
शिबिराच्या आयोजनासाठी ग्रामपंचायत कवठा येथील सरपंच निलेश डफरे, उपसरपंच रविंद्र कुहीटे, ग्रामपंचायत सदस्य शाबान सिद्धिकी आणि नाना इंगळे यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी वर्गाने सहकार्य केले. नागरिकांना त्यांच्या गावातच प्राथमिक आरोग्य तपासणी व वैद्यकीय मार्गदर्शन मिळाल्याने शिबिराचा मोठा लाभ झाला.





