spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

आठवणी धूसर झाल्या… पण माणुसकीने हात धरला!

– रामटेकला मुलीकडे जाण्याच्या प्रयत्नात ८० वर्षीय वृद्ध महिला कामठीत भरकटल्या; पोलिसांनी सुखरूप पोहोचविले घरी

संदीप कांबळे, कामठी :- वयाची 72 वर्षे… हातात आधारासाठी काठी… डोळ्यांसमोर मुलीकडे जाण्याची आस… मात्र, स्मरणशक्तीची साथ सुटल्याने पत्ता आणि मार्ग विसरलेल्या एका वृद्ध महिलेची अवस्था कामठी बसस्थानकावर पाहून अनेकांचे मन हेलावले. ‘मुलीकडे रामटेकला जायचे आहे… तिचे नाव विद्या आहे,’ एवढीच माहिती त्यांच्या स्मरणात होती. मात्र, पुढचा मार्ग त्यांना ठाऊक नव्हता.

लिहिगाव येथील आपल्या घरातून भरकटलेल्या अवस्थेत निघालेल्या दारंबा चव्हाण (वय 72) कशाबशा कामठी बसस्थानकावर पोहोचल्या. गळ्यात सोनसाखळी, जवळ रोख रक्कम आणि हातात काठी असल्याने त्यांची असहाय्यता पाहून त्यांचा गैरफायदा घेतला जाण्याची भीती होती.

याचवेळी समाजसेवक बंटी गायकवाड यांच्या नजरेस ही वृद्ध महिला पडली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी क्षणाचाही विलंब न करता पोलिसांशी संपर्क साधला. ‘ही आजी सुरक्षितपणे घरी पोहोचली पाहिजे,’ या भावनेतून त्यांनी दाखविलेली तत्परता माणुसकीचे दर्शन घडविणारी घटना आज दुपारी 1 वाजता कामठी बस स्थानकावर ठरली.

नवीन कामठी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांना भ्रमणध्वनीद्वारे माहिती मिळताच पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांच्या आदेशानुसार महिला पोलीस शिपाई प्राची गीरहे यांनी पुढाकार घेतला. विशेष म्हणजे, त्यांनी स्वतः पोलीस वाहन चालवत या वृद्ध महिलेला कामठी बस स्थानकाहुन सोबत घेतले आणि त्यांची काळजी घेत सुरक्षितपणे लिहिगाव येथील घरी पोहोचविले.

घरी पोहोचल्यानंतर वृद्ध महिलेच्या चेहऱ्यावर उमटलेला दिलासा आणि सुरक्षित घरी परतल्याचा आनंद हा या संपूर्ण घटनेचा भावनिक क्षण ठरला. हरवलेला मार्ग पोलिसांनी दाखविला आणि हरवलेला विश्वास माणुसकीने परत मिळवून दिला.

आजच्या धावपळीच्या जगात अनोळखी वृद्ध महिलेकडे दुर्लक्ष करण्याऐवजी तिच्या मदतीला धावून जाणारे बंटी गायकवाड आणि पोलिसांच्या या संवेदनशील भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे. ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या कर्तव्यापलीकडे जाऊन माणुसकीचा हात पुढे करणाऱ्या नवीन कामठी पोलिसांनी एका वृद्ध मातेच्या सुरक्षित परतीची कहाणी लिहिली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.