spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नियमित कर्ज भरणे हा शेतकऱ्यांचा गुन्हा आहे का? दीपमाला भवसागर यांचा शासनाला संतप्त सवाल

– कर्जमाफी न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा; सिहोरा परिसरातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त पाठिंबा

हंसराज,सिहोरा भंडारा :- शासनाकडून जाहीर केल्या जाणाऱ्या कर्जमाफी योजनांचा लाभ नेहमीच केवळ थकीत कर्जदारांना मिळतो, मात्र अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पोटाला चिमटा काढून बँकेचे कर्ज नियमित फेडणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच येते. “नियमित कर्ज भरणे हा शेतकऱ्यांचा गुन्हा आहे का?” असा जळजळीत सवाल तुमसर पंचायत समिती सदस्य दीपमाला भवसागर यांनी उपस्थित केला आहे. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी किंवा प्रोत्साहनपर लाभ द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.

प्रामाणिक शेतकऱ्यांची उपेक्षा थांबवा शासनाच्या धोरणांवर टीका करताना दीपमाला भवसागर म्हणाल्या की, कर्जमाफीच्या घोषणा नेहमी केल्या जातात, पण त्याचे निकष हे केवळ थकबाकीदार शेतकऱ्यांच्या हिताचे असतात. जे शेतकरी वेळेवर कर्जाची परतफेड करतात, त्यांना शासन वाऱ्यावर सोडते. हा प्रकार आता सहन करण्यापलीकडे गेला आहे. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा स्वाभिमान जपण्यासाठी शासनाने आपल्या धोरणात तातडीने बदल करणे गरजेचे आहे.

जगाच्या पोशिंद्याला घोषणा नको, न्याय हवा “शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, त्याला केवळ पोकळ घोषणांची गरज नाही, तर प्रत्यक्ष न्यायाची गरज आहे,” असे स्पष्ट मत भवसागर यांनी व्यक्त केले. सिहोरा क्षेत्रासह राज्यातील सर्वच प्रामाणिक कर्जदार शेतकऱ्यांसाठी विशेष कर्जमाफी योजना किंवा प्रोत्साहनपर अनुदान जाहीर करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

आंदोलनाचे संकेत लोकप्रतिनिधी म्हणून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा देणे माझे कर्तव्य आहे. जर शासनाने या मागणीची दखल घेतली नाही, तर सिहोरा क्षेत्रातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन मोठे जनआंदोलन उभारले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. सिहोरा परिसरातील शेतकऱ्यांनी दीपमाला भवसागर यांच्या या भूमिकेचे स्वागत करून आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे.

Popular Articles