नागपूर १३ : नागपूर जिल्हा सत्र न्यायालय परिसरात शुक्रवारी सायंकाळी अचानक न्यायाधीशांच्या कारला आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेमुळे काही वेळासाठी अफरातफर माजली होती.
न्यायालय परिसरात उभी असलेल्या कारमधून अचानक धूर निघू लागला आणि क्षणातच ती कार आगीत भडकली. त्यावेळी परिसरात हजर असलेले पोलिस हवालदार सुनील तिवारी यांनी तत्परता दाखवत त्वरित अग्निशमन दलाला माहिती दिली. सूचना मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवले.
अग्निशमन कर्मचाऱ्यांच्या दक्षतेमुळे आग न्यायालय परिसरातील इतर वाहनांपर्यंत पसरली नाही. त्यामुळे सर्व वाहने सुरक्षित राहिली. घटनेच्या वेळी मोठ्या संख्येने वकील आणि कर्मचारी उपस्थित होते, मात्र कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
आग लागण्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलिस आणि अग्निशमन विभागाने संयुक्तरीत्या तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे न्यायालय परिसरातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.




