spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

‘फायर मॅन’ घडविणारे कळमना प्रादेशिक अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महानगरपालिकेतर्फे संचालित होणारे विदर्भातील एकमेव प्रशिक्षण केंद्र

नागपूर, ता. १४ :  नागपूर महानगरपालिकेच्या कळमना येथील प्रादेशिक अग्निशमन प्रशिक्षण केंद्र ‘फायर मॅन घडविणाऱ्या एका महत्त्वाच्या संस्थेच्या रुपात उदयास आले आहे. या प्रशिक्षण केंद्रातून गेल्या 9 वर्षात शेकडो उमेदवारांना ‘फायरमॅन’चे प्रशिक्षण मिळाले असून, अनेक ठिकाणी हे उमेदवार आपली सेवा देत आहेत. याशिवाय अग्निशमन जवानांना अधिक दर्जेदार प्रशिक्षण मिळावे, म्हणून मनपातर्फे नवीन जलतरण तलाव बांधला आहे. या जलतरण तलावाचे लोकार्पण राज्याचे  मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. विदर्भातील महानगरपालिकेतर्फे संचालित होणारे हे एकमेव अग्निशमन  प्रशिक्षण केंद्र आहे.

मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी आणि अतिरिक्त आयुक्त  वसुमना पंत, अतिरिक्त आयुक्त   वैष्णवी बी. यांच्या मार्गदर्शनात मुख्य अग्निशमन अधिकारी  तुषार बाराहाते यांच्या नेतृत्वात अग्निशमन विभागात अत्याधुनिक सेवा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. कळमना येथील प्रादेशिक अग्निशमन प्रशिक्षण केंद्रात अग्निशमन जवानांना दर्जेदार प्रशिक्षण देण्यसाठी नवीन जलतरण तलाव तयार केल्याने अग्निशमन विभागाला अधिक बळ मिळाले आहे.

नागपूर महानगरपालिकेने शहरातील आगीच्या घटनांवर तसेच आपत्कालिन स्थितीवर अधिक प्रभावीपणे नियंत्रण मिळवण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. शहराच्या वर्दळीच्या ठिकाणी, बाजारातील अरुंद रस्ते असलेल्या वस्त्यातील आगीच्या घटनांवर त्वरित नियंत्रण आणण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ असणे आवश्यक आहे. ही गरज लक्षात घेऊनच मनपातर्फे प्रादेशिक अग्निशमन  प्रशिक्षण केंद्राची सुरुवात  ७ नोव्हेंबर २०१६ करण्यात आली.  राज्यभरातील अग्निशमन दलाच्या जवानांना प्रशिक्षण देण्याचे काम प्रादेशिक अग्निशमन प्रशिक्षण केंद्र करत आहे. गेल्या ९ वर्षात १४ तुकड्यांच्या प्रशिक्षणातून शेकडो उमेदवारांना दर्जेदार प्रशिक्षण मिळाले आहे.

या प्रशिक्षण केंद्राचे क्षेत्रफळ १०८८३.७२ चौ.मी असून त्यापैकी २४२.८२० चौ.मी जागेवर प्रादेशिक अग्निशमन प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आले आहे. प्रशिक्षण केंद्राची इमारत २ मजली असून यात उपमुख्य अग्निशमन अधिकारी, व प्रशिक्षण केंद्राचे मुख्य पर्यवेक्षक यांचे कार्यालय, विश्राम कक्ष, कॅन्टीन, स्टोअर रूम, प्रशिक्षणार्थी उमेदवारांकरीता २ डॉरमेट्री, मेस व क्लास रुम आहेत. प्रशिक्षणार्थ्यांकरीता कवायत व प्रात्याक्षिके करीता पटांगण, त्याचबरोबर प्रशिक्षणार्थ्याकरीता १ ड्रिल टावर सुद्धा उपलब्ध करून देण्यात आले आहे.

विदर्भातील महानगरपालिकेचे एकमेव केंद्र

नागपूर व विदर्भातील उमेदवारांना मुंबई, पुणे, ठाणे येथे प्रशिक्षणासाठी जावे लागत असे. या नवीन प्रशिक्षण केंद्रामुळे विदर्भातील विद्यार्थ्यांना इतरत्र ठिकाणी जाण्याची गरज भासत नाही. या प्रशिक्षण केंद्रामुळे विदर्भात ‘फायर मॅन’ करिअर म्हणून निवड करणाऱ्या उमेदवारांना पंख दिले आहे.

अग्निशमन सेवा अकादमी तर्फे घेतली जाते परीक्षा

प्रादेशिक अग्निशमन प्रशिक्षण केंद्रात येण्यापूर्वी महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी, मुंबईतर्फे उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी घेण्यात येते. यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची 100 गुणांची परीक्षा घेतली जाते. या परीक्षेत उर्त्तीण झालेल्या उमेदवारांना नागपुरातील प्रादेशिक अग्निशमन प्रशिक्षण केंद्रासह राज्यातील इतर प्रशिक्षण केंद्रात पाठविले जाते.

वर्षातून दोन वेळा प्रशिक्षण

नागपुरातील मनपाच्या प्रादेशिक अग्निशमन प्रशिक्षण केंद्रात एकाच वर्षी जानेवारी ते जुलै आणि जुलै ते डिसेंबर दरम्यान दोन बॅच चालतात. सहा महिन्याच्या प्रशिक्षणात उमेदवारांना अग्निशमन विभागाशी संबंधित सर्वच प्रशिक्षण दिले जाते. या सहा महिन्यात प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांची  महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी, मुंबईतर्फे  परीक्षा घेतली जाते. या परीक्षेत उर्त्तीण झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ प्रमाणपत्र दिले जाते. विशेष असेकी देशात कुठेही अग्शिनम विभागात नोकरीची संधी उपलब्ध असल्यास या प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाते अशी माहिती प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख  मो. अकलिम करीम शेख यांनी दिली.

जवानांसाठी जलतरण तलाव

मनपाच्या अग्निशमन जवानाकरीता  २ जून २०२५ पासून प्रादेशिक अग्शिनमन प्रशिक्षण केंद्र कळमना येथे जलतरण तलाव सुरु करण्यात आले आहे. लवकरच या जलतरण तलावात अग्निशमन सेवा बजावणाऱ्या जवानाकरीता दोन बॅच मध्ये प्रशिक्षणाची सुरुवात होणार आहे. या जलतरण तलावात फिल्टरेशन प्लांट सह तलावाच्या सभोवती संपूर्ण सुरक्षा भिंत सुद्धा तयार करण्यात आली आहे. जलतरण तालावाची लांबी व रुंदी २५ बाय १५ मीटर व खोली १ ते ३ मीटर आहे. जलतरण तलावाकरीता १ कोटी ३९ लक्ष ९७ हजार रुपये खर्च करण्यात आले आहे. तर फिल्टरेशन प्लांटकरीता ५९ लक्ष ८६ हजार २४६ रुपये खर्च करण्यात आले आहे. तसेच सध्या प्रशासनाने अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांची कमतरता लक्षात घेता व अतिवृष्टी कालावधीची दखल घेत प्रशिक्षीत  ६८  अग्निशमन विमोचक/ इनर्टन्स 4 महिन्याच्या कालावधी करिता विशेष मानधनावर नियुक्त केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.