ज्वाला धोटे यांनी नागपूर महानगरपालिकेकडे एफआयआर दाखल करण्याची मागणी
नागपूर ०८ : महानगरातील नगर भूमापन कार्यालय क्रमांक ३ ने माजी नगरसेवक कमलेश चौधरी व त्यांच्या कुटुंबीयांशी संबंधित एका मालमत्तेच्या पत्रकाची नक्कल २७ जून २०२५ रोजी रद्द केल्याची माहिती समोर आली असून, ही नोंद अधिकृत दस्तावेजांशी विसंगत व शासकीय जमिनीचा समावेश असल्यामुळे अमान्य ठरवण्यात आली आहे. या प्रकरणात अन्याय निवारण मंचाच्या अध्यक्षा ज्वाला जांबुवंतराव धोटे यांनी नागपूर महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्याकडे लेखी तक्रार देत चौधरी कुटुंबाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे. धोटे यांच्या म्हणण्यानुसार सदर नक्कलचा वापर नगर रचना विभागात इमारतीचा आराखडा मंजूर करून घेण्यासाठी, झोन कार्यालयाच्या नोटीसांना उत्तर देण्यासाठी तसेच मालमत्ता कर विभागात नाव नोंदवण्यासाठी करण्यात आल्याचा आरोप आहे. सिटी सर्व्हे कार्यालयाने आपल्या तपासात या मालमत्ता पत्रकात ४३.८७ लाख चौ. फूट शासकीय जमिनीचा समावेश असून, दिलीप चौधरी (कमलेश चौधरी यांचे वडील) यांचे नाव लीजहोल्डर म्हणून नमूद करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. या घटनेमुळे महापालिकेची व इतर शासकीय यंत्रणांची फसवणूक झाल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला असून, हा प्रकार भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम ३१६, ३१८ आणि ३३६(३) नुसार दंडनीय असल्याचेही धोटे यांनी नमूद केले आहे. यासंदर्भात कमलेश चौधरी आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया अद्याप प्राप्त झालेली नाही; त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि उत्तर मिळाल्यानंतर त्यास पुढील बातमीत समाविष्ट करण्यात येईल.




