– राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या आंदोलनाच्या यशस्वितेसाठी ११ जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती; जिल्हानिहाय जनजागृती करण्याचा निर्धार
नागपूर :- राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने येत्या १४ व १५ डिसेंबर २०२६ रोजी दिल्ली येथील रामलीला मैदानावर आयोजित करण्यात येणाऱ्या धरणे आंदोलनात ओबीसी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, या उद्देशाने राष्ट्रीय खैरे कुणबी महासंघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक रविवार, १ नोव्हेंबर रोजी नागपूर येथील हॉटेल अतिथी इन, मानेवाडा येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. राष्ट्रीय खैरे कुणबी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गुणेश्वर आरीकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा ज्येष्ठ मार्गदर्शक डॉ. बबनराव तायवाडे यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. यावेळी दिल्ली येथे होणाऱ्या आंदोलनाची पार्श्वभूमी, त्यामागील भूमिका, ओबीसी समाजाच्या विविध प्रश्नांबाबतची भूमिका आणि आंदोलनाच्या यशस्वितेसाठी करावयाच्या नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीला प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय युवाध्यक्ष सुभाष घाटे, राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्ष रत्नमाला पिसे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सहसचिव शरदराव वानखेडे, ज्येष्ठ सल्लागार तथा विदर्भ अध्यक्ष शकील पटेल, नागपूर शहर जिल्हाध्यक्ष परमेश्वर राऊत, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर, राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या डॉक्टर सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. विनोद चौधरी, राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष श्याम लेडे आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. बबनराव तायवाडे यांचे सविस्तर मार्गदर्शन
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. बबनराव तायवाडे यांनी राष्ट्रीय ओबीसी महासंघाची स्थापना, संघटनेची कार्यपद्धती, आजपर्यंत ओबीसी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी केलेला संघर्ष आणि विविध स्तरांवर राबविण्यात आलेल्या उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. ओबीसी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व राजकीय प्रगतीसाठी संघटित शक्ती निर्माण करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
ओबीसी समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे आणि देशाचे लक्ष वेधण्यासाठी दिल्ली येथील रामलीला मैदानावर १४ व १५ डिसेंबर रोजी धरणे आंदोलन आयोजित करण्यात येत आहे. या आंदोलनात केवळ काही मोजक्या कार्यकर्त्यांनी नव्हे, तर देशभरातील ओबीसी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपली एकजूट दाखवून द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
समाजाच्या हक्कांसाठी संघटितपणे आवाज उठविणे, आपल्या मागण्यांची तीव्रता शासनापर्यंत पोहोचविणे आणि ओबीसी समाजामध्ये व्यापक जनजागृती निर्माण करणे यासाठी अशा आंदोलनांचे महत्त्व मोठे आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक, महिला तसेच समाजातील विविध घटकांनी आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवावा, असेही त्यांनी सांगितले.
११ जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांचा सहभाग; जिल्हानिहाय जनजागृतीचा निर्धार
सदर बैठक राष्ट्रीय कार्यकारिणीची असल्यामुळे महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांतील राष्ट्रीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत दिल्ली येथील आंदोलनाची माहिती समाजातील तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हानिहाय नियोजन करण्यावर विशेष भर देण्यात आला. प्रत्येक जिल्ह्यात बैठका, समाज बांधवांशी संवाद आणि जनजागृतीच्या माध्यमातून आंदोलनाबाबत वातावरणनिर्मिती करावी. तसेच जास्तीत जास्त ओबीसी बांधवांनी दिल्ली येथे पोहोचून आंदोलनात सहभागी व्हावे, यासाठी पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे ठरविण्यात आले.
गुणेश्वर आरीकर यांचे एकजुटीचे आवाहन
बैठकीच्या अध्यक्षीय भाषणात राष्ट्रीय खैरे कुणबी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. गुनेश्वरराव आरीकर यांनी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या नेतृत्वाखाली होणारे दिल्लीतील आंदोलन यशस्वी करण्यासाठी खैरे कुणबी महासंघ पूर्ण ताकदीने सहकार्य करेल, असा विश्वास व्यक्त केला. प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपापल्या जिल्ह्यात आंदोलनाबाबत व्यापक जनजागृती करावी. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत आंदोलनाचा उद्देश पोहोचवून जास्तीत जास्त ओबीसी समाज बांधवांना दिल्ली येथील धरणे आंदोलनात सहभागी होण्यासाठी प्रेरित करावे. ओबीसी समाजाची ताकद ही त्याच्या एकजुटीत असून, सर्वांनी संघटनात्मक जबाबदारी ओळखून काम केल्यास आंदोलन निश्चितच प्रभावी ठरेल, असे आवाहन त्यांनी केले. या बैठकीच्या माध्यमातून दिल्ली येथील आंदोलनाच्या यशस्वितेसाठी राष्ट्रीय खैरे कुणबी महासंघाने संघटनात्मक पातळीवर पुढाकार घेण्याचा निर्धार व्यक्त केला. ओबीसी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी सर्व समाजबांधवांनी एकत्र येऊन आपली सामूहिक ताकद दाखविण्याची गरज असल्याचा सूर बैठकीत व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. त्यानंतर उपस्थित पदाधिकारी व मान्यवरांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.








