Home Latest News रामटेक येथे किसान समृद्धी मेळावा आणि कृषी प्रदर्शनी संपन्न

रामटेक येथे किसान समृद्धी मेळावा आणि कृषी प्रदर्शनी संपन्न

0
58

 

रामटेक, नागपूर  १३ : शेतकऱ्यांनी शाश्वत शेतीचा अवलंब करून कृषी उत्पादने घेणे, जमिनीची सुपीकता टिकवणे, उत्पादन खर्च कमी करणे आणि पर्यावरणपूरक शेतीला प्रोत्साहन देणे या उद्देशाने कृषी विभागाच्या वतीने रामटेक येथील नेहरू मैदानावर किसान समृद्धी मेळावा आणि कृषी प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले.

मेळाव्याचे उद्घाटन राज्याचे महसूल मंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री  रविशंकर, कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी, कृषी आयुक्त सुरज मांढरे, जिल्हाधिकारी डॉ. विपिन, सावनेर विधानसभा क्षेत्राचे आमदार आशिष देशमुख यांच्या हस्ते झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमात कृषी विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी मांडला. अपर मुख्य सचिव रस्तोगी यांनी नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प, कृषी समृद्धी योजना, कृषी यांत्रिकीकरण अभियान, राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत सूक्ष्म सिंचन योजनेबाबत माहिती दिली. तसेच Mahavistar AI app या डिजिटल मित्राबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून त्याचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन केले.

कृषी मंत्री भरणे यांनी रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीवर होणाऱ्या परिणामाबाबत चिंता व्यक्त केली व एआय तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे सुचवले. “मातीतून अन्न, अन्नातून आरोग्य आणि आरोग्यातून उन्नती” हा मूलमंत्र त्यांनी शेतकऱ्यांना दिला. पाशा पटेल यांनी बांबू लागवड हा शाश्वत शेतीचा उत्तम पर्याय असल्याचे सांगून शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. पालकमंत्री बावनकुळे यांनी महिला गटांना चारा उत्पादनाकरिता महसूल जमिनी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

मेळाव्यात जिल्हाधिकारी कार्यालय आणि आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्यात नाला खोलीकरण, सेंद्रिय प्रमाणीकरण व फिरती माती प्रशिक्षण प्रयोगशाळांबाबत सामंजस्य करार झाला. टाटा ट्रस्टसोबत कौशल्य विकास व बांबू खरेदीसाठीही करार करण्यात आले. या प्रसंगी टाटा ट्रस्टने 3000 विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाकरिता 115 कोटींचा CSR निधी उपलब्ध करून देणार असल्याचे जाहीर केले.

प्रदर्शनात शेतकरी बचत गटांची सेंद्रिय उत्पादने, कृषी विभागाच्या योजनांतील शेती उत्पादने, कृषी विद्यापीठ, महाबीज, कृषी उद्योग विकास महामंडळ व खाजगी कंपन्यांची दालने उभारण्यात आली होती. प्रगतशील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या फळे, भाजीपाला, फुले आदींचे नमुने प्रदर्शनात ठेवण्यात आले. तांत्रिक सत्रात डॉ. विनोद खडसे यांनी सेंद्रिय शेती, निविष्ठा उत्पादने, निर्यात पद्धती व जैविक निविष्ठा केंद्रांबाबत मार्गदर्शन केले.

या मेळाव्यास नागपूर जिल्ह्यातील 15 हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी भेट दिली. यशस्वी आयोजनासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविंद्र मनोहरे, प्रकल्प संचालक (आत्मा) डॉ. अर्चना कडू, विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे व कृषी विभागातील अधिकारी-कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.